उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र.-९ मधील भाजपाच्या उमेदवार डिम्पल ठाकूर यांच्या प्रचाराकरिता लावलेल्या बॅनर, पोस्टर्स व स्टीकरवर त्यांच्या फोटोऐवजी वडील व विरोधी पक्षनेता कुमारी ठाकूर यांचा फोटो लावल्याच्या प्रकाराची निवडणूक विभागाने दखल घेत कारवाई सुरू केल्याची माहिती विजया जाधव यांनी दिली. या प्रकाराबाबत काँग्रेससह अन्य विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली होती. या प्रभागामध्ये कांटे की टक्कर असून प्रभाग संवेदनशील आहे. शिवसेनेच्या रिंकू केदार, साई पक्षाच्या सुजाता रिजवानी व भाजपाच्या डिम्पल कुमारी ठाकूर यांच्यात तिरंगी सामना आहे. डिम्पलच्या फोटोऐवजी वडील कुमारी ठाकूर यांचा फोटो लावून प्रचार केला. निवडणूक आचारसंहितेचे पालन होते किंवा कसे, यावर लक्ष ठेवण्याकरिता असलेल्या पथकाच्या चौकशीत भाजपाने डिम्पल यांच्याऐवजी त्यांच्या वडिलांचा फोटो लावल्याचे आढळले. स्वत: कुमारी ठाकूर हेच उमेदवार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला गेला, असे निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सादर झालेल्या अहवालात सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ वडिलांवर कारवाई सुरू
By admin | Published: February 17, 2017 1:57 AM