ठाणे : धूम स्टाइलने हातातील मोबाइल फोन हिसकावणाऱ्या वागळे इस्टेट येथील अजय शंकर वायकर (२२) आणि कासारवडवली येथील कुणाल राकेश वाल्मीकी (२०) या सराईत दुकलीला राबोडी पोलिसांनी अटक केली. त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून अॅक्टिव्हा आणि पाच मोबाइल फोन हस्तगत केले आहेत. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा या वर्षातील दाखल झालेला पहिला गुन्हा आहे. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या दोघांना तत्काळ अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.ब्रह्मांडनाका येथील जितेंद्र नाथ पांडे (३१) हे १ जानेवारी २०२० रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई एक्स्प्रेस हायवेने कॅडबरी चौकाकडून ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील बसथांब्याकडे पायी जात होते. त्यावेळी अॅक्टिव्हावरून आलेल्या दुकलीने त्यांच्याकडून मोबाइल हिसकावून पोबारा केला होता. याचदरम्यान, राबोडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून त्या दोघांना तत्काळ अटक केली. त्यांच्याकडून अॅक्टिव्हा आणि पाच मोबाइल फोन असा ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राबोडी, कासारवडवली आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यांत त्याच्याविरोधात त्याच दिवशी दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ते दोघे सराईत मोबाइल चोरटे असल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.
सराईत गुन्हेगारांकडून पाच मोबाइल्ससह अॅक्टिव्हा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:06 AM