- अजित मांडके
ठाणे : एकीकडे युतीबाबत अद्यापही फॉर्म्युला निश्चित होत नसल्याने शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्येही तशी चाचपणी सुरू आहे. मात्र, मागील विधानसभेपाठोपाठ आता लोकसभेत मिळालेल्या यशामुळे पक्षात अनेक इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. त्यामुळेच ठाण्यातून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे ये-जा सुरु आहे.
विशेष म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे. मात्र, भाजप ठाणे शहर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्यापही युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठ जरी युती होणार असल्याचे सांगत असले तरी ती होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांनी मात्र देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळेच शिवसेनेपाठोपाठ भाजपमध्ये देखील काही जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे.
यासाठी काहींनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे, तर काहींनी घरोघरी जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे, काहींनी तर तिकीट आपल्यालाच मिळणार असा थेट दावा केला आहे. केवळ मागील लोकसभा निवडणूक त्यांनतर झालेल्या विधानसभा आणि यंदा पुन्हा लोकसभेत मिळालेल्या यशाच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी वरिष्ठांकडे घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे.
आधीच मोदी लाटेमुळे काही जण कसेबसे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, असे असतानाही त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. यासाठी काही जण आशिष शेलार, काही थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्याला मध्यस्थी करून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यात त्यांच्याच पक्षाचा विद्यमान आमदार असतानाही त्याठिकाणीही काही इच्छुकांनी प्रभावी दावा केला आहे.भाजपने सुद्धा ठाण्यातील बहुतेक मतदारसंघात एक नव्हे तीन तीन सर्व्हे केले आहेत. यामध्ये विद्यमान आमदाराकडून कशी कामे झाली, ते पुन्हा निवडून येऊ शकतात की नाही, नवीन चेहरा दिला तर काय परिणाम होऊ शकतो, आदींसह इतर काही महत्त्वाच्या बाबीही या सर्व्हेत तपासल्या आहेत.
ठाण्यासाठी शिवसेनेकडून दबावदुसरीकडे शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून तो मिळावा यासाठी वरिष्ठांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानिकांकडूनही या मतदारसंघासाठी दबाव टाकला जात आहे. परंतु, प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक आमदार असावा असे भाजपचे धोरण असल्याने ते हा मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.