ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहाला शुक्रवारपासून विविध लाेकाेपयाेगी उपक्रमांद्वारे सुरुवात झाली. त्यानुसार ठाणे शहरातील विविध भागांत विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे आणि सरचिटणीस विलास साठे आदी उपस्थित होते.
ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात फळे आणि बिस्किटे वाटप, पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेंतर्गत कोपरीत ज्ञानेश्वरनगर येथे रेशन बॅग व धान्यवाटप, वर्तकनगरमध्ये विधवा मिहलांना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य नागरिकांचीही उपस्थिती होती.
महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांच्या वतीने हिरानंदानी इस्टेटमध्ये आधारकार्ड शिबिर भरविले होते. सेवा सप्ताहाचे औचित्य साधून भाजपा ठाणे, वैद्यकीय आघाडी व आयटी सेल यांच्यावतीने राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा पार पडली. के. बी. पी. महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात खासदार सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.