ठाणे – चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेने ठाण्यातील एका गंभीर समस्येला फेसबुक लाईव्हद्वारे वाचा फोडली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून कुशलने ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करत काहीतरी करा अशा शब्दात ठाणेकरांची कैफियत मांडली आहे. रात्री उशिरा कुशल बद्रिकेने हे लाईव्ह केले आहे.
या लाईव्हमध्ये कुशल बद्रिके म्हणतो की, मी ठाण्यात सूरज वॉटरपार्क समोर राहतो, त्याठिकाणी वाघबीळजवळ जो ब्रीज रस्त्यापासून वेगळा होतो त्याठिकाणी कोणतीही स्ट्रीट लाईट नाही, याठिकाणी रोज अपघात होतात. वारंवार अपघात घडतात, रिक्षा पलटतात. आताही येथे अपघात झाला आहे असं सांगत त्याने डंपर दुभाजकाला धडकला असल्याचं दृश्य दाखवलं. त्यामुळे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष द्याव ही विनंती आहे. काहीतरी करा, लोक त्रासात आहेत. प्रचंड नुकसान होत आहे असं त्याने सांगितले.
तसेच हा माझा कोणताही स्टंट नाही, कोणाकडेही माझे बोट दाखवत नाही. मी खूप दिवसांपासून विचार करत होतो. नेहमी याठिकाणी काही ना काही घडत असतं. हा व्हिडीओ त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचावा, लाईट लावा किंवा रेडियम लावा जेणेकरुन वाहन चालकांना ज्याठिकाणी ब्रीज सुरु होतो ते कळेल...त्यामुळे अनेकांचे जीव वाचवू शकतो असंही कुशल बद्रिकेने म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी कुशलनं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांच्या जाहिरातीत काम केले होते. यावेळी कुशल बद्रिकेने व्हिडीओच्या माध्यमातून ठाण्यातील विविध विकासकामे आणि इतर गोष्टींचा प्रचार केला होता.