ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ समशाजुद्दीन सिद्दीकी याची सोमवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. मात्र, अपेक्षित माहिती न मिळाल्याने त्याची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.सीडीआर प्रकरणामध्ये पोलिसांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील रिझवान सिद्दीकी यांनाही यापूर्वी अटक केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यासह बारापैकी एकूण सहा आरोपी बाहेर पडले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई असलेल्या तेराव्या आरोपीलाही आसाम पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्यांचे वकील असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी सीडीआर प्रकरणातील एका आरोपीकडून बेकायदेशीररीत्या सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. अॅड. सिद्दीकी यांचे मोबाइल फोन आणि लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असतानाच, त्यांच्याविरोधात दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. सोमवारी समशाजुद्दीनची चौकशी करण्यात आली असून त्यात समाधानकारक असे काही हाती लागलेले नाही.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:27 AM