डोंबिवली : मालिका हा अस्थिर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकारात तग धरणे कठीण जात असले, तरी मालिका गाजली तर त्या कलाकाराच्या नाटकाला प्रेक्षक येतात. मात्र, काम कितीही कठीण असले तरी दिलेले प्रत्येक काम आपण मनापासून करायचे असते, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी दिला.चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्र मांतर्गत सुहास जोशी यांच्या गप्पांचा कार्यक्रम रविवारी सुयोग मंगल कार्यालयात झाला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. जोशी म्हणाल्या, नव्या लेखकांनी भरपूर वाचन करणे गरजेचे आहे. प्रतिभा ही जन्मजात मिळतेच असे नाही. ती अभ्यासातूनही मिळवावी लागते. सध्या नाटककार एखादा धागा पकडतात व नाटक लिहितात. त्यांचा प्रयत्न निश्चितच चांगला असतो, पण त्या मानाने प्रेक्षक रंगभूमीकडे खेचले जात नाहीत. प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचणे महत्त्वाचे आहे. ‘अश्रंूची झाली फुले’ या नाटकाबद्दल सांगताना आजही या नाटकाला खूप गर्दी होते. मुळातच त्या काळातील नाटकांची संहिता बळकट होती. त्यामुळे ती नाटके मंचावर पुन:पुन्हा येतात आणि यशस्वी होतात, असे त्या म्हणाल्या.दिवंगत कलाकाराच्या जागी दुसरा कलाकार हा पारखून घेतलेला असतो. त्यामुळे ‘ती फुलराणी’ या नाटकातील हेमांगी कवी हिची भूमिका वाखाणण्यासारखी असल्याचे त्यांनी नमूद केले. विनोदाच्या दर्जामध्ये राजा परांजपे, राजा गोसावी हे उत्तम दर्जाचे कलावंत होते. हिंदीमध्ये हा दर्जा ओमप्रकाश, मेहमूद यांनी राखला. यावेळी त्यांनी एखादी बाहेरची घटना वेगळी काढून दाखवणे म्हणजे नाटक असते, अशी साधी सोपी नाटकाची व्याख्या त्यांनी स्पष्ट केली. नाटकात १० टक्के अधिक अभिनय करायचा असतो. नाटक करताना बाहेर बघू नये, आपल्या भूमिकेकडे लक्ष द्यावे, असे जोशी यांनी सांगितले.अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या आठवणी जागवताना ती माझी नुसती मैत्रीणच नाही तर बहीण होती. तर, सई परांजपे यांच्याकडे मी वयाच्या ८ ते ११ वर्षांपर्यंत पुणे रेडिओवरील बालोद्यानामध्ये मी गात होते. ‘आनंदी गोपाळ’ या नाटकाने प्रसिद्धी दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर देशपांडे, तर प्रदीप इनामदार यांनी आभार मानले.शं.ना., एलकुंचवार उत्तम लेखकशं.ना. नवरे हे लेखक म्हणून ग्रेट होते. शन्ना हे नेहमी आपल्या सर्वांसाठी नाटक लिहीत होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.महेश एलकुंचवार हे देखील उत्तम लेखन करत. त्यांनी लिहिलेल्या तीन नाटकांमध्ये काम केल्याची आठवण सांगताना त्यांनी लिहिलेले आत्मकथा हा नाटकाचा एक वेगळा प्रयोग आहे.या नाटकात ज्योती सुभाषचंद्र आणि त्या स्वत: आलटूनपालटून भूमिका करत असल्याची आठवण त्यांनी जागवली.
मालिका अस्थिर प्रकार असल्याने तग धरणे कठीण, अभिनेत्री सुहास जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:42 AM