ठाणे: कौटुंबिक कलहातून कळव्यात १७ वर्षीय श्रुती या मुलीचा खून करु न प्रज्ञा प्रशांत पारकर (४०) या टीवी कलाकार असलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली. जिमवरुन सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पती प्रशांत घरी परतला, त्यावेळी हा प्रकार उघड झाला.कळव्यातील प्रमिला हॉस्पीटल समोर असलेल्या गौरीसमुन सोसायटी या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील २०४ क्रमांकाच्या खोलीत पारकर कुटूंब वास्तव्याला आहे. आयात निर्यातीचा खासगी व्यवसाय करणारे प्रशांत पारकर (४२) हे नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका जिममध्ये गेले होते. ते ९.३० वाजण्याच्या सुमारास परतले. त्यावेळी आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी जिममधील रुपेश तळवार यांच्यासह काही मित्रांना तिथे बोलविले. या मित्रांच्या तसेच एका ग्रीलवाल्याच्या मदतीने त्यांनी बाहेरील लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बारावीमध्ये शिकणारी त्यांची मुलगी श्रुती बैठकीच्या (हॉल) खोलीत उलटी पहूडलेली दिसली. ती बेशुद्धावस्थेमध्ये होती. तर स्वयंपाकगृहामध्ये पंख्याला पत्नी प्रज्ञाने गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये आढळल्याने त्यांना धक्काच बसला. शेजारी तसेच मित्रांच्या मदतीने त्यांनी या दोघींनाही तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेंव्हा या दोघींचाही मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही माहिती मिळताच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, पोलीस उपायुक्त एस. एस. बुरसे आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तिने लिहिलेली चिठ्ठीही एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पोलिसांना मिळाली. मानसिक आणि कौटुंबिक कारणामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तिने यात म्हटले आहे. प्रज्ञाने आधी मुलीचा चादरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:ही स्वयंपाकगृहातील खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने टीव्हीवरील काही मालिकांमध्ये दुय्यम भूमीका केल्या आहेत. तसेच मालिकांच्या कथानकांचे लेखनही तिने केले आहे. एका आगामी चित्रपटातही तिने भूमीका साकारली असून तो चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सध्या तिला चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम मिळणे जवळपास बंद झाले होते. तर त्याचाही आयात निर्यातीचा व्यवसाय फारसा होत नव्हता. त्यामुळे तो घरीच असायचा. यासह आणखी काही कारणांमुळे त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरु होते, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. तिने मुलीचा खून आणि स्वत: आत्महत्या करण्याइतपत नेमके काय कारण घडले याबाबत उलगडा झाला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.
‘‘दोघा पतीपत्नीमध्ये काही वाद होते. आर्थिक कारणही आहे. मुलीला सोबत घेऊन जात असून आपण आत्महत्या करीत आहे. अशा आशयाची चिठ्ठीही घरात मिळाली आहे. सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.’’एस.एस. बुरसे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर