ठाणे : आताच्या पिढीला शॉर्टकट आणि सर्वकाही रेडिमेड हवे आहे. पण, यातून जीवन समृद्ध होणार नाही. इंग्रजी शाळांमध्ये शिकणे हे स्टेटस समजले जात असले तरी, मराठी भाषेपासून दूर जाता येणार नाही, असे प्रतिपादन अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी बुधवारी केले. कोणतेही क्षेत्र निवडा, शिक्षणाला पर्याय नाही. वाचन करा, मेहनत करा. शिक्षण आणि ज्ञान हे शाश्वत आहे. चेहरा हा १० वर्षांनंतर नसणार. तुमचे सौंदर्य हे अंतरंगातून येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सातवे पुष्प अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी गुंफले. आमची पिढी छोटेमोठे आनंद हरवत असते. त्यापैकी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. हा सुगंध महागड्या पुष्पगुच्छांमध्ये नाही मिळणार, असे सांगताना तेजश्री यांनी त्यांच्या दिनचर्येबद्दल सांगितले. मी अभिनेत्री नसते तर समीक्षक, समुपदेशक किंवा मोटिव्हेशनल स्पीकर असते. झेंडा चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात केली, हे सांगताना प्रधान म्हणाल्या की, नाटक हे सर्वात प्रभावी अभिनयाचे माध्यम आहे. नाटकात दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवायचे असते आणि ते आव्हान सोपे नसते. मालिका आणि सिनेमांत रिटेक असतो. पण, नाटकात रिटेक मिळत नाही.
आयुष्यात जितके यश महत्त्वाचे तितकेच अपयशही महत्त्वाचे असते. कारण, अपयशातून आपण शिकत जातो. आजची तरुणाई कलाकारांना जेव्हा आदर्श मानते, तेव्हा कलाकाराला सामाजिक बांधीलकीतून वागावे लागते. समाजाचे प्रबोधन होईल, असे काही काम करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची असेल, तर स्वत:साठी वेळ काढावा लागतो. स्वत:ला शिस्त लावावी लागते, असे अनुभव त्यांनी कथन केले.
मराठी भाषेची समृद्धी अफाट आहे. आपले लेखक आजन्म पुरेल इतके समृद्ध लेखन देऊन गेले आहेत. पुनर्जीवित नाटकं रंगमंचावर येत आहेत. ही नाटकं वाचल्यावर मला जाणवते की, त्या लेखकांची दूरदृष्टी किती व्यापक होती. आपल्या सामाजिक कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, खूप मुलांना मनापासून शिक्षण घेण्याची इच्छा असते. आपल्या मिळकतीतला खारीचा वाटा त्यांच्या शिक्षणासाठी उचलण्याचे काम मी करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांनीही मनोगत व्यक्त केले. समितीचे सचिव शरद पुरोहित यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी नंदिनी गोरे यांनी मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. कलेला भाषेचे बंधन नाही. प्रत्येक कला ही भाषेच्या प्रत्येक संस्काराला अनुसरून व्यक्त केली जाते. प्रसिद्ध व्हायला जाऊ नका, कारण यश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठीण असते, असा कानमंत्रही त्यांनी तरुणाईला दिला.वाचनामुळे झाले यशस्वीआम्ही मोठ्या गाड्यांत फिरतो, महागडे कपडे घालतो हे सर्वांना दिसते. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केलेला असतो.शूटिंगसाठी मी डोंबिवली ते अंधेरी प्रवास करायचे, तेव्हा एक पुस्तक जवळ ठेवायचे. त्यामुळे एका लेखकाची साथ मला असायची. वाचनामुळेच मी इथपर्यंत पोहोचले असल्याचे तेजश्री प्रधान यावेळी म्हणाल्या.