ठाणे :यंदाच्या कट्ट्यावर आषाढी वारी निमित्त "विठ्ठला विठ्ठला"या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कट्ट्याच्या बालसंस्कार शास्त्राच्या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
विठ्ठल नामाची शाळा भरली या गाण्यावर एका नास्तिक विद्यार्थ्याची विठ्ठलाच्या चमत्कारामुळे आस्तिक झाल्याची गोष्ट नृत्याच्या माध्यमातून दाखवली गेली.यात श्रेयस साळुंखे , अर्णव पवार, प्रथम नाईक, सई कदम, प्रांजल धारला, आर्य माळवे, वैष्णवी चेउलकर , पूर्वा तटकरे, चिन्मय मौर्य , अद्वैत मापगावकर , निमिष पिंपरकर यांनी सहभाग घेतला , याचे नृत्यदिग्दर्शन परेश दळवी याने केले. या सोबतच दिव्यांग कला केंद्राच्या भूषण गुप्ते, अविनाश मुंगशे, निशांत गोखले, संकेत भोसले, गौरव राणे, अनमय मेत्री, पार्थ खडकबाण, आरती गोडबोले, जान्हवी कदम,ऋतुजा गांधी, अपूर्वा दुर्गुळे या विद्यार्थ्यानी माऊली माऊली या नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांना पंढरपूरला गेल्याचा आनंद दिला व दाखवून दिलं की ही सर्वच मुलं खरंच सर्वच बाबतीत विशेष उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. उपस्थित सर्वच रसिकांची उभं राहून टाळ्या वाजवून दाद दिली. अभिनय कट्टा संस्कार शास्त्र अकॅडमीतील महिला कलाकारांनी रावणाचा वनवास हि विनोदी एकांकिका सादर केली.नाटक बसवताना झालेली दमछाक आणि अचानक घडणारे विनोदी प्रसंग या नाटकात पाहायला मिळाले.आरती ताथवडकर - सेक्रेटरी, मौसमी घाणेकर- राम, रोशनी उंबरसाडे-वशिष्ठ मुनी, रोहिणी थोरात- शोभा, साक्षी महाडिक- मंगल, विजया साळुंके-सीता ,न्यूतन लंके-रावण या सर्वच कलाकारांनी आपल्या जबरदस्त टायमिंगमुळे रसिकांना विनोदाची मेजवानी दिली. या वेळी कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.सहदेव कोळंबकर आणि कुणाल पगारे यांनी "माऊली" हि द्वीपात्री सादर केली.आपल्याला मुलगी होणार हे लक्षात येताच स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे मनाशी ठरवलेल्या एका गृहस्थाला साक्षात विठ्ठल येऊन स्त्रीचे महत्व कसे पटवून देतो व माऊली हे सुद्धा स्त्रीचे रूप आहे आणि मीच तुझ्या मुलीच्या रुपात जन्म घेणार असे सांगतो आणि तो गृहस्थ विठ्ठलाचे आभार मानतो व नतमस्तक होऊन पांडुरंगाची माफी मागतो, या द्विपात्रीत विठ्ठल सहदेव कोलंबकर व गृहस्थ कुणाल पगारे याने साकारला. अशा पद्धतीने अभिनय कट्ट्याच्या एकूण ४० कलाकारांनी ३८६ क्रमांकाचा कट्टा विठ्ठलाच्या नामस्मरणाने गाजवला. आषाढी वारीला प्रत्येकालाच विठ्ठलाचे दर्शन मिळेल असे नाही पण आपण आपल्या कलेच्या माध्यमातुन विठ्ठला पर्यंत पोहचू शकतो.कामात देव शोधला कि देवच आपल्याला शोधत येऊ शकतो.म्हणून असे आध्यात्मिक कार्यक्रम कलेच्या मध्यमातून सादर होणे गरजेचे आहे असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले.