अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:21 PM2018-12-12T23:21:49+5:302018-12-12T23:22:06+5:30
१५ डिसेंबरचे अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
भाईंदर : मीरा-भाईंदरला वीजपुरवठा करणारी तत्कालिन रिलायन्स एनर्जी ही कंपनी ताब्यात घेताच अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीने वीजदरात तब्बल १८ टक्के वाढ केली. ही दरवाढ बेकायदा असल्याचा दावा करत ती त्वरित मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ती १५ डिसेंबरपर्यंत मान्य न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.
दर चार वर्षांनी वीज नियामक आयोगाकडून पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दरवाढ करण्यास परवानगी दिली जाते. त्याचा दर ०.२५ टक्के इतका अपेक्षित असतो. परंतु, त्यात यंदा भरमसाठ वाढ करून ग्राहकाच्या माथी अव्वाच्यासवा वाढीव दराचे वीज बिल दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
पूर्वी शहराला रिलायन्स एनर्जी कंपनीकडून वीजपुरवठा केला जात होता. ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीने आॅगस्ट २०१८ मध्ये ताब्यात घेतली. यानंतर कंपनीने वीज दरात सरसकट १८ टक्के वाढ करून ग्राहकांच्या माथी वाढीव दराची बिले मारली आहेत. यामुळे ग्राहक त्रस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कंपनीने केलेली वीजदरवाढ बेकायदा असून ती वीज नियामक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. दरवाढ मागे घेऊन वीज नियामक आयोगाच्या परवानगीनेच ती लागू करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ही दरवाढ मागे घेण्यासाठी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटीच्या भार्इंदर येथील उत्तर विभागीय कार्यालयातील अधिकाºयांची मंगळवारी भेट घेत त्यांना निवेदन दिले.
ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
याबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विजेंद्र भावसार यांनी सांगितले की, तत्कालिन रिलायन्स एनर्जी कंपनीने २२ डिसेंबर २०१७ रोजी आयोगाकडे वीजदरवाढीची याचिका दाखल केली होती. त्यावर २ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी होऊन आयोगाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. २८ आॅगस्ट रोजी ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटीने ताब्यात घेतल्यानंतर आयोगाने १२ सप्टेंबरला दरवाढीचा निर्णय दिला.
तो १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे वीजवापर वाढल्याने शुल्क वाढले. त्यानुसारच ग्राहकांना बिले दिली असून त्यात दरवाढीपेक्षा जास्त तफावत असल्यास ती पुढील बिलातून आपोआप वळती केली जाते. याबाबत ग्राहकांचे शंका निरासन करण्यासाठी कंपनीने १५ डिसेंबरपर्यंत शिबिरांचे आयोजन केले असून २४ तास हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे.