भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेतकरी सध्या शेतीला मत्स्योत्पादनाची जोड देत असून, शेततळ्यांच्या मदतीने लाखोंचे उत्पादन घेऊ लागले आहेत.
तालुक्यात केवळ पावसाळ्यात शेती केली जाते. मात्र, अनेक प्रकारची संकटे येत असल्याने शेतकरी देशोधडीला लागलेला असतानाच आता त्यांनी शेतीला मत्स्य उत्पादनाची जोड दिली आहे.
तालुक्यातील वेहलोंढे या गावी जितेश विशे या शेतकऱ्याने आपल्या शेततळ्यातून सध्या लाखो रुपयांचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. सरकारी अनुदान मिळाले असून, या अनुदानातून त्यांनी शेततळे तयार केले आहे. यामध्ये रोहू कटला, मिर्गल यांसारख्या माशांचे बियाणे टाकले आहे. आजघडीला मासे एक किलोच्या वजनाचे झाले असून, त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.
यामधून त्यांनी आतापर्यंत एक लाख रुपये उत्पन्न घेतले असून, आणखी दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळेल, असा आशावाद विशे यांनी व्यक्त केला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी अशा प्रकारची शेती केली तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपल्या शेतामध्ये पाणीसुद्धा अडवले जाईल. त्यामुळे इतर पिकेही घेणे सहज शक्य होईल.
तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेततळी निर्माण झाली असून, यासाठी सरकार त्यांना अनुदान देत असल्याने त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. या शेतीतून आपल्याला कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. अशा प्रकारची योजना ही खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
--------------------------------
फोटो ओळ : जितेश विशे यांनी सरकारी अनुदानातून शेततळे तयार केले आहे. (छाया : जनार्दन भेरे)