ठाणे: तलावांच्या सुशोभीकरणच्या नावाखाली अतिरिक्त सिमेंट वापर केला जातो. तलाव तयार होत असताना त्याचे पोषण मूल्ये कमी असतात. दर पावसात पाणी वाहत येत तेव्हा मातीतून पोषण द्रव्ये घेऊन येते. ते तलावात साठून राहते, पुन्हा पुन्हा ती वापरली जातात, अशा पद्धतीने पोषणाची उपलब्धता तलावात वाढत असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. पुरुषोत्तम काळे यांनी दिली.
ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' ही मोहीम ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ब्रम्हाळा तलाव या ठिकाणी 'तलावांवर बोलू काही' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रा. काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी तलाव कसे तयार होते ? त्याचे प्रकार? यांची माहिती देत सविस्तर मार्गदर्शन केले . त्यावेळी पुढे ते म्हणाले, "माझा तलाव" ही चळवळ अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. तलाव मरणापासून वाचवण्यासाठी तलावांची खोली तशीच राहिली पाहिजे. त्यातील वाढलेली सेंद्रिय मूल्ये काढली पाहिजे. तलाव हा मध्यावर खोल अधिक असल्यास त्या जागी जलचर चांगल्या पद्धतीने वास्तव्य करू शकतात असे त्यांनी नमूद केले.
माझा तलाव मला वाचवायचा आहे. त्यासाठी आपल्या वृत्तीत बदल करावा लागणार आहे. तलावावर गेल्यावर माशांना पाव टाकू नये, तलावाच्या परिसरात कचरा करू नये, पाण्यात निर्माल्य टाकू नये, तलावाच्या भोवती असलेली झाडे वाचवली पाहिजेत याबरोबर तलावावर येणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे. ज्यावेळी नागरिकांना तलाव हे आपले वाटतील तेव्हा खऱ्या अर्थाने माझा तलाव मोहिमेचे व्यापक रूप होईल असा आशावाद प्रा. काळे यांनी व्यक्त केला. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर, कविता वालावलकर, सुरभी वालावलकर - ठोसर, नूतन बांदेकर व इतर उपस्थित होते. शेवटी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.