ठाणे : दिवाळीदरम्यान जिल्ह्याबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्या ठाणेकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान ३७ मार्गांवर जाताना आणि येतानाच्या मिळून ७४ फेऱ्यांचे नियोजन आहे.दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील आठ आगारांतून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाण्यातील दोन आगारांतून १५ मार्गांवर, भिवंडीतून ४ मार्गांवर, शहापुरातून ४, कल्याणमधून ६, मुरबाडमधून ३, वाड्यातून ३ तर विठ्ठलवाडी येथून २ मार्गांवर एसटी सोडण्यात येणार आहे. ठाणे-शिरूर, ठाणे-मेहकर, बोरीवली-मंचर, ठाणे-उस्मानाबाद, ठाणे-उमरगा, ठाणे-दहिवडी या मार्गांवर प्रत्येकी एक तर ठाणे-कराड मार्गावर ४ फेऱ्या होणार आहेत..भिवंडी आगारातून भिवंडी-श्रीवर्धन, भिवंडी-जुन्नर, भिवंडी-कळंब, भिवंडी-माजलगाव या मार्गांवर एसटी फेऱ्या होणार आहेत. शहापूर आगारातून शहापूर-धुळे, शहापूर-साक्री, शहापूर-चोपडा, शहापूर-चाळीसगाव तर कल्याण आगारातून कल्याण-धुळे, कल्याण-लोणार, कल्याण-रावेर, कल्याण-सातारा, कल्याण-भोरगिरी, कल्याण-अक्कलकोट मार्गावर एसटी सोडल्या जाणार आहेत.
ऑनलाइन बुकिंगला चांगला प्रतिसाद ७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दिवाळी जादा एसटी फेऱ्यांसाठी ऑनलाइन बुकिंगही सुरू झाले असून त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आगारातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.