उल्हासनगर : महापालिकेने ६५ कर्मचाऱ्यांना दिलेली अतिरिक्त वेतनवाढ वादात सापडली असून शासनाकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून अतिरिक्त वेतनवाढीची कपात महापालिकेने सुरू केली असून यविरोधात कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातले आहे.
उल्हासनगर महापालिका कारभाराबाबत एकेक प्रकार उघड होत आहेत. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेने तब्बल ६५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली आली आहे. याबाबत महापालिकेने चौकशी केली असता, अटी-शर्तीचे भंग करून अतिरिक्त वेतनवाढ दिल्याचे उघड झाले. यादरम्यान सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक तानाजी पतंगराव यांचे ३ वेतन वाढीचे दरमहा २४०० रुपये तर उमेश ठाकूर यांचे ४ वेतन वाढीचे दरमहा ३२०० रुपये गेल्या ४५ महिन्यांपासून कपात होत आहे. अशी माहिती उमेश ठाकूर यांनी दिली. त्यांनी वेतनवाढ कपात करू नये, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधीताकडे साकडे घातले आहे.
महापालिकेने कामकाजासंबंधी विविध प्रशिक्षण पूर्ण करून अतिरीक्त वेतनवाढ दिलेल्या ६५ कर्मचाऱ्या पैकी फक्त सेवानिवृत्त झालेल्या तानाजी पतंगराव व उमेश ठाकूर या दोन कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना, सुनावणी न देता निवृत्ती वेतनातून गेल्या ४५ महिन्या पासून बेकायदेशीररीत्या ४-४ वेतनवाढ कपात केल्या जात आहे. अशी माहिती या दोन कर्मचाऱ्यांना दिली. मात्र दुसरीकडे कार्यरत ६३ अधिकारी, कर्मचारी यांना या अतिरिक्त वेतनवाढीचे लाभ दिले जात आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना एक न्याय व निवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय कसा? असा प्रश्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महापालिका अधिकारी यांच्याकडे साकडे घालून न्याय देण्याची मागणी केली.
शासनाकडे मागितला अभिप्राय - उपायुक्त अशोक नाईकवाडे
महापालिकेने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अतिरिक्त वेतनवाढ दिली. मात्र वेतनवाढ देतांना अटी व शर्तीचा भंग झाल्याचे उघड झाल्यावर, याबाबत महापालिकेने शासनाकडे अभिप्राय मागविला आहे. शासनाने दिलेला अभिप्राय सकारात्मक आल्यास, अतिरिक्त वेतनवाढ सुरू राहणार आहे. तर यादरम्यान सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून लेखा विभागाने दिलेल्या निदर्शनास नुसार अतिरिक्त वेतनवाढीची कपात सुरू आहे.