राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने ८ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती महापौर डिंपल मेहता यांनी न केल्याने सेनेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी थेट व्यासपीठावर येऊन महापौरांशी शाब्दिक बाचाबाची केल्याने महापौरांनी त्यांना नुकतेच समजपत्र पाठविले. त्यावर पाटील महापौरांना सोमवारी पाठविलेल्या पत्रात सेना स्टाईलने प्रत्युत्तर दिल्याने सेना-भाजपात चांगलीच जुंपणार असल्याचे भाकीत राजकीय मंडळी करु लागली आहेत.पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर विरोधी पक्षातील सेना-काँग्रेस सत्ताधा-यांच्या मनसुब्याला रेटून विरोध करीत आहे. विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष सेना असल्याने नियमानुसार विरोधी पक्ष नेता पद या पक्षालाच मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी १६ आॅक्टोबरला पार पडलेल्या विशेष महासभेत राजू भोईर यांच्या नावाची शिफारस त्या पदासाठी केली. याच महाभसेत भोईर यांच्या नावाची घोषणा महापौर करतील, अशी अपेक्षा सेनेची होती. परंतु, महापौरांनी ती पुढील महासभेपर्यंत टाळली. यानंतर दुसरी महासभा ८ नोव्हेंबरला पार पडली. त्यातही महापौरांनी त्या पदावरील नियुक्तीला बगल दिल्याने सेना व काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले. त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यापैकी पाटील यांच्यासह इतर सेना व काँग्रेसचे सदस्य थेट व्यासपीठावर चढले. काहींनी तर महापौर, उपमहापौर चंद्रकांत वैती यांचे माईक खेचले. त्यात नगरसचिवांचा माईक मात्र तुटला. यात पाटील यांनी थेट महापौरांशी शाब्दिक बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्या गोंधळातच सत्ताधाय््राांनी स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. प्रमोद महाजन सांस्कृतिक भवन साकारण्याच्या विषयासह विविध महत्वांच्या विषयांवरील एकुण १८ ठराव आपल्या मर्जीनुसार मंजुर केले. सभागृहातील गोंधळामुळे अवघ्या दोन तासांतच महासभा उरकण्यात आली. त्याचे चित्रीकरण सर्वत्र व्हायरल होऊन प्रसिद्धी माध्यमांत पालिकेच्या सभागृहातील गोंधळाचे वाभाडे निघाले. अखेर महापौरांनी पाटील यांना ९ नोव्हेंबरला एका महिला महापौरांसोबत त्यांनी गोंधळ घालुन केलेले गैरवर्तन खेदजनक असल्याने यापुढे तसे केल्यास कायदेशीर कारवाईचे समजपत्र दिले. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी महापौरांवर मराठी भाषेचा तिरस्कार करीत असल्याचा आरोप करीत आगरी-कोळी या भूमीपुत्रांसह ज्येष्ठ सदस्यांचा सभागृहात अपमान करीत असल्याचा आरोप केला. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयावर विरोधी पक्ष म्हणुन सेनेला सुचना करायच्या होत्या. परंतु, तो प्रस्ताव सत्ताधा-यांनी घाईघाईने मंजूर केला. यावरुन भाजपाला ठाकरे यांचे कलादालन होऊच द्यायचे नाही, असा आरोप पाटील यांनी थेट आ. नरेंद्र महेता यांचे नाव न घेता केला आहे. भाजपाला सत्तेचा अहंकार असल्याने पुढे तो विनाशाकडे घेऊन जाईल, असे भाकीत करून पालिका आपली खाजगी मालमत्ता समजू नये, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे मेहता यांना लगावला. सेनेला लढाई काही नवीन नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा करुन प्रशासनाला दोन्ही कलादालन साकारण्याच्या सुचना द्याव्यात. अन्यथा सेना विरोधी पक्ष नेत्याचे दालनातुनच कारभार सुरु करेल, अशा इशारा दिला आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्याचे दालन तळमजल्यावर स्थलांतर करायचे आहे. सध्या ते दुस-या मजल्यावर असल्याने त्या पदावरील नावाची घोषणा झाल्यास दुस-या मजल्यावरील त्या दालनाचा कब्जा सेना कदापि सोडणार नाही. अशी भिती भाजपाला वाटत असल्यानेच ते घोषणा करण्यास टाळाटाळ करीत असावेत, असा तर्क लढविला जात आहे.
विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून ८ नोव्हेंबरच्या महासभेत घातलेल्या गोंधळावर महापौरांचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 5:07 PM