ठाणे - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गिरगाव येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांनी मनसेवर टीका केली. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती लोकांचा सणवार आणि उत्सवातील उत्साह वाढत आहे. आम्ही त्याला कोणताही राजकीय रंग देत नाही. खऱ्या भक्तीने दिवस साजरा करत आहोत, असे त्यांनी म्हटले. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या महाआरतीवरुन मनसेनं त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करुन दिली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टिका केली.
आमचे हिंदुत्व हे ‘रघुकुल रीत चली आये, प्राण जाये पर वचन न जाये’, या तत्त्वानुसार आहे. तोच आमचा धर्म आहे आणि आम्ही त्याचे पालन करतो, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. आदित्य यांच्या या महाआरतीनंतर मनसेनं शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. हा मूर्खाचा बाजार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी म्हटलंय.
''आम्ही आरती करतोय ते आमच्या आंदोलनाचा भाग आहे. सरकारमधले लोकं मुर्खासारखं आमच्यामागे पळत सुटलेत. आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री आहेत. जल, वायू, ध्वनी प्रदुषण हे त्यांचंच काम आहे ना. मग त्यांनी हे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी काहीतरी करायचं, का आरती करत बसायचं?'', असा सवाल मनसचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.
तसेच, ''हा मूर्खांचा बाजार आहे, थोडक्यात आम्ही करतोय म्हणून तुम्ही करताय. मुद्दा अजूनही त्यांना कळाला नाही हे दुर्दैव आहे. आज आम्ही अखंड रामचरितमानस पाठ करत आहोत तर पोलिसांनी येथील स्पीकर बंद केले. तिकडचे स्पीकर बंद करण्याची हिंमत दाखवावी ना, असेही राजू पाटील यांनी म्हटले. तुम्हाला कायदा राबविण्यासाठी लोकांनी निवडून दिलंय, मग आरत्या काय करत बसलाय,'' असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
खरी श्रद्धा ही मनात आणि हृदयात असावी लागते. राजकीय व्यासपीठावर असून चालत नाही, अशा शब्दात मनसेवर टीका करतानाच मी रोज हनुमान चालिसाचे पठण करतो, असा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला. तसेच, भाजपची ‘बी आणि सी’ टीम राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. ते यांना योग्य उत्तर देतील. शिवाय, आम्ही स्टटंबाजी करत नाही तर काम करतो, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.