भिवंडी-
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य असलेल्या ठाण्यात जाहीर सभा घेत शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता खाऊन खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेलेत अशी घणाघाती टीका केली. तसंच जे आज बंड आणि उठाव केल्याचं बोलत आहेत त्यांनी उठाव नव्हे, गद्दारी केलीय असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. गद्दारीच आहे. हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केलं असतं. हिंमत असती तर इथून सूरतेला पळाले नसते. तिथं गुवाहाटीला जाऊन ४० आमदार मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
हे सरकार कोसळणारच"सध्या सुरू असलेलं राजकारण नाही. ही सर्कस आहे. आज जे निष्ठानंत शिवसेनेसोबत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते घाबरणारे नाहीत. घाबरणारे असते तर सूरतेला आले असते. आज ते ठामपणे शिवसेनेच्या पाठिशी उभे आहेत. हे नवं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. लिहून घ्या", असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.