मुंबई/ठाणे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जबरी सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुती सरकावर आदित्य यांनी जोरदार प्रहार केला. ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन त्यांनी शिंदे गटाला इशाराच दिला. तर, जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कलही केली. आदित्य यांच्या या कृत्यावर उपस्थितांमधून वन्स मोअरचा प्रतिसाद आल्याचे दिसून आले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर, दिवंगत आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असतांना मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नसल्याचे आर्श्चय वाटते. आजही, मोर्चा काढतांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी आल्याचे सांगत आदित्य यांनी टीकेची झोड उठविली.
महिलांवर हात उचलायचा, सुषमाताईंवर शिवीगाळ करायची, सुप्रियाताईंवर शिवीगाळ करायची. पण, मर्दानगी दाखवायची... असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभेत नक्कलच केली. असा शर्ट खाली करायचा, असं वरतीसरती बघत, मग दाढी खाजवून दाखवत आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली.
आदित्य ठाकरेंनी काकांचा गुण घेत थेट जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. त्यावेळी, उपस्थित लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत आदित्य यांच्या कृत्याला दाद दिली. तसेच, वन्स मोअर वन्स मोअर... ची घोषणाबाजीही केली. मात्र, अशी माणसं ओन्ली वन्स असतात, त्यांना पुन्हा येऊ द्यायचं नाही, असे म्हणत पुन्हा नक्कल करणं आदित्य यांनी टाळलं. मात्र, पुढील काही मनिटांतच पुन्हा एकदा शर्ट खाली खेचत त्यांनी शिंदेंची नक्कल केली.
जेलमध्ये भरणार ही शपथ घ्यायला आलोय
तुम्हाला आज सांगतोय मी, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, तर काही तासांचं आहे. पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं करणार. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे लोकांसाठी गरजेचं आहे, ते केल्याशिवाय राहणार नाही हेच आज सांगायला इथे आलोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर व महायुती सरकारवर निशाणा साधला. जे कोणी अधिकारी असतील, आयएएस असतील, आयपीएस असतील, त्या गद्दार गँगमधील चिलटी असतील, त्यांना सांगतोय मी. सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन घेणार आहे. आंदोलन नव्हे, हे आंदोलनजीवी नाहीत, तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये भरणार, हीच शपथ घ्यायला दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर मी आलोय, असे म्हणत आदित्य यांनी ठाकरी शैलीत शिंदे गटावर निशाणा साधला.