अजित मांडके, ठाणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौरा केला असतानाच आता त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सांयकाळी ते ठाण्यातील विविध पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असून येथील शिवसेना शाखांना देखील भेटी देणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदार संघात असलेल्या शाखेचा शुभारंभ देखील आदित्य यांच्या हस्ते केला जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरे हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, किंबहुना आजही तो आहे. परंतु मागील दोन वर्षापूर्वी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता ठाण्याची शिवसेना कोणाची, यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार चुरस लागली आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेतील बहुसंख्य नगरसेवकांचे पाठबळ आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे एक खासदार आणि काही नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यातही येथील शाखांवर देखील शिंदे यांच्या शिवसेनेचा ताबा आहे. मात्र ठाण्यातील शिवसेना कुठेच गेलेली नसून ती आमच्याकडेच असल्याचा दावा संजय राऊत नुकताच ठाण्यात केला होता. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील तोडलेल्या शाखेला भेट दिली होती. तसेच मुंब्रा, कळवा आणि ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले होते. दिव्यात आदित्य ठाकरे यांनी देखील दोन महिन्यांपूर्वी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता पुन्हा आदित्य ठाकरे हे ठाण्यातील घोडबंदर भागात आणि शहरातील मध्यवर्ती भागात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच शाखांना देखील भेटी देणार आहेत.
आदित्य ठाकरेंचे मुंबईच्या वेशीवर म्हणजेच आनंद नगर जकात नाका आणि नंतर जागो जागी जंगी स्वागत केले जाणार आहे. कोपरी पाचपाखडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जिजामाता नगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन शाखेचे उद्घाटन आदित्य यांच्या हस्ते होणार आहे. या शाखेच्या ठिकाणी ते भाषणही करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी घोडबंदर येथील नरेश मणेरा यांच्या शाखेला, चंदणवाडी शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था पाहता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
असा असेल आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा
घोडबंदर रोड -आनंद नगर शाखा (नरेश मणेरा) – सायं. ६:०० वा.मानपाडा रोड-मनोरमा नगर शाखा संतोष शिर्के प्रदीप पूर्णेकर) – सायं. ७:०० वा.ठाणे महापालिका जवळ- चंदनवाडी शिवसेना शाखा – रात्री ८:०० वा.समता नगर- जिजामाता नगर शिवसेना शाखा उद्घाटन अमोल हिंगे संजय दळवी रात्री. ९:०० वा.