ठाणे : महापुराचे संकट ओढवलेल्या कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी ठाण्यातून ७० डॉक्टरांचा चमू रविवारी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना झाला. सध्याची स्थिती बिकट आहे. अशावेळी एकमेकांवर टीका न करता पूरग्रस्तांच्या मदतीकडे लक्ष केंद्रित करावे. शिवसेनाही त्यालाच प्राधान्य देत असून, सध्या कोणत्याही राजकीय डावपेचात न पडता केवळ पूरग्रस्तांना मदत पोहोचवणे, हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी केले.ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ७० डॉक्टरांचे वैद्यकीय मदत पथक रविवारी पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरकडे रवाना झाले. या पथकात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असून, सोमवारपासून सलग पाच दिवस सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.‘आणखी मदत पोहोचवू’या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पूरग्रस्त भागात पहिल्या दिवसापासून शिवसैनिक कार्यरत आहेत. मुंबई, ठाण्यातून बिस्किटे, औषधे, ब्लँकेट्स, भांडी, पाण्याच्या बाटल्या यासाख्या आवश्यक वस्तूंची मदत पाठवली आहे. तेथील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी उघडले नाहीत. परंतु, जसजसे रस्ते उघडतील, तसतशी मदत पुढे पाठवत राहू.दोन दिवसांपूर्वी मुंबईहून डॉक्टरांची, काल महापालिकेच्या पेस्ट कंट्रोलची टीम, तर आज ठाण्यातून ७० डॉक्टरांची टीम पाठवण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईहून ७० पशुतज्ज्ञांचे पथकही पाठवण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्र, कोकण ज्या-ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, तेथे मदत पाठवली जात आहे. पूरग्रस्तांना निधी जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, सध्या मदत पोहोचवण्यास प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.प्रत्येकी १० डॉक्टरांचा चमू तयार करण्यात आला असून, त्यांच्या मदतीने विविध भागांत आरोग्यतपासणी आणि औषधपुरवठाही केला जाणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाण्यातून ७० डॉक्टरांचा चमू रवाना - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:30 AM