ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील अडवली ढकळी येथील शाळेच्या परिसरात रहिवाश्यांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असतानाही कल्याण -डोंबिवली महापालिकेचे यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असताना 'लेटेस चेंज' उपक्रम राबवून जि.प.चा शिक्षण विभागासह महापालिका या संकटात विद्यार्थ्यांना ढकलत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
या शाळेच्या भिंतीलगत, मैदानावर कचरा टाकून रहिवाश्यांकडून दुर्गंधी पसरवली जात आहे. या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा हिवताप, डेंग्यू सारख्या साथीच्या आजारास विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागण्याच्या शक्यतेला येथील शिक्षकांनाही दुजोरा दिला आहे. केडीएमसीच्या कार्यक्षेत्रातील अडिवली ढोकळी गावच्या शाळा व्यवस्थापनाने महापालिका यंत्रणेचे त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केलेली आहे. मात्र कचऱ्याच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. रहिवाशी त्याचा गैरफायदा घेऊन शाळेच्या आवारात कचरा टाकून मोकळे होताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेसाठी समस्या गंभीर झाल्याचे सांगितले जात आहे.
या शाळेत गरीब, कष्टकरी कुटुंबातील पहिली ते आठवीपर्यंत तब्बल २००पेक्षा अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची गुणवत्ता उत्तम असून उच्चशिक्षित महिलावर्ग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शासनाकडून व प्रतिष्ठित ग्रामस्थांकडून शाळेला सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा, खेळसाहित्य उपलब्ध केले जात आहे. शाळेला प्रशस्त व मोठे क्रिडांगण आहे. मात्र संरक्षक भिंत नसल्यामुळे शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मैदानावर विद्यार्थ्यांना खेळांचा आनंद घेता येत नाही. परिसरातील रहिवाश्यांकडून घरातील ओला, सुका कचरा, या शाळेसह आरोग्य केंद्रालगत फेकून दिला जात आहे. त्यावर भटकी कुत्री, डुकरे, उंदीर,घुशी यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.टट
कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या शिक्षकांना या रहिवाश्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शाळेच्या नळकनेक्शनमधून पाणी चोरले जाते. यामुळे अनेक वेळा शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे आदी समस्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक मेटाकुटीला आलेला आहे. मनमानी करणाऱ्या या रहिवाश्यांवर दंडात्मक कारवाईची गरज असल्याचे येथील जाणकारांसह कडून सांगिततले जात आहे.