ठाणे : जिल्ह्यातील आदिवासींना उपजीविकेसाठी सामूहिक वनहक्क मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या हेतूने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन मुरबाड परिसरातील आदिवासींना गुरुवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २०० हेक्टर वनजमिनीचे सामूहिक वनहक्क प्रदान केले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यांत आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. वनउपज आणि वनसंपत्तीवर त्यांचा अधिकार आहे. यादृष्टीने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सामूहिक वनहक्क पट्टे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदान करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार, त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुरबाडच्या १२ गावांच्या ग्रामस्थांना वनहक्क पट्टे वाटप केले. यातून आदिवासींना उपजीविका तर करता येणार आहेच, शिवाय जंगलांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन होण्यासही मदत होणार आहे. राज्यपालांनी वेळोवेळी वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हे अधोरेखित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ठाणे जिल्हा प्रशासनाने जास्तीतजास्त दावे मंजूर करण्याचे उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वाचे आहे. समारंभपूर्वक वाटप करण्यात आलेल्या वनपट्टेवाटपात ३३४ हेक्टरचा सर्वात मोठा वनहक्क पट्टा असून सर्वात कमी २९ हेक्टरचा पट्टा आहे. वनपट्टेवाटप केलेले कोचरे बु.(चासोळे), थितबी (फांगुळगव्हाण), खापरी, आल्याची वाडी (मेदी), मढवाडी (मढ), लोत्याचीवाडी (मेदी), केव्हारवाडी (कुडशेत), फांगुळगव्हाण, धारखिंड, मोधळवाडी (मेदी), वढू (चिखले), खपाचीवाडी (कोळोशी), जांभूळवाडी (माळ), भांगवाडी (चासोळे) आणि सावर्णे (फांगुलगव्हाण) या गावांतील ग्रामस्थ आदिवासींना वनपट्टे कसण्याचा हक्क जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आदिवासींना मिळाला जंगल कसण्याचा हक्क
By admin | Published: July 29, 2016 2:41 AM