मुरबाड : तालुक्यातील १८ गावे आणि ३३ वाड्यापाड्यांत डिसेंबर पासून उद्भवलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून टँकर पुरविण्याचे आदेश दिले होते. तसेच टँकर ठेकेदाराला दररोज आकारण्यात आलेले भाडे आणि प्रति कि.मी चा दर देण्यासंबंधीचे आदेशही संबधित तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिले होते. असे असतानाही मे महिना सुरू झाला तरी ते टँकर मुरबाडला पोहोचलेच नसल्याने प्रशासनाने एप्रिल फूल केले की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे, ठेकदाराची निवड होऊनही अद्याप त्याला पुरवठ्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.मुरबाड तालुक्यातील पाटगावमोहघर, तागवाडी, गेटाचीवाडी, साकुर्ली, तुळयी, म्हाडस, बांधिवली, देहरी, खोपिवली, थितबी, झाडघर न्याहाडी या गावांसह सुमारे ५१ गावांमध्ये डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाई आहे. घोटभर पाण्यासाठी त्या गावांचा प्रशासन दरबारी टाहो सुरु आहे. या मागणीचा विचार करु न जिल्हा प्रशासनाने तसा आराखडा तयार केला आणि टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जाहिरात देऊन निविदाही मागवण्यात आल्या. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून टंचाईग्रस्त भागात टँकर पोहोचणे आवश्यक होते. मात्र, ते अद्याप पोहोचलेले नाहीत. (वार्ताहर)
प्रशासनाने केले ‘एप्रिल फुल’
By admin | Published: May 02, 2017 2:28 AM