ठाणे - एकीकडे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढल्याचे दाखले पालिका प्रशासनाकडून दिले जात आहेत. वास्तविक पाहता, वाढलेले हे उत्पन्न याचा फायदा खाजगी कंत्राटदाराला अधिक होत असल्याचा आहे. त्यामुळे परिवहनच्या हक्काच्या बसेस मार्गावर धावत नसून हा प्रशासनाचा खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वागळे आगाराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या निर्दशनास अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यात १८७ बसेस असल्या तरी प्रत्यक्षात त्यातील केवळ ५९ बसेसच रस्त्यावर धावत आहेत. टायर नसल्याने तब्बल ४० बसेस बंद अवस्थेत आहेत, तर इतर किरकोळ दुरुस्तीसाठी देखील बसेस बंद आहेत. मोठा गाजावाजा करुन घेण्यात आलेल्या १० एसी बसेस देखील बंद असल्याची बाब या पाहणी दौऱ्यात समोर आल्याचे केळकर यांनी सांगितले. एकीकडे उत्पन्न वाढविले असल्याचे भासविले जात असतांना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून केवळ आपल्या बसेस बंद करुन, कामगारांवर पोटमारीची वेळ आणत आहेत, एकूणच हा सर्व प्रकार म्हणजे परिवहनचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाणेकरांना चांगली सेवा मिळावी म्हणून परिवहन सेवा सुरु करण्यात आली. परंतु आता तीच सेवा बंद करण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधाºयांकडून आखला जात आहे. खाजगी कंत्राटदाराला परिवहनचे रुट देऊन त्याचे खीसे गरम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कामगारांची १४ टक्के थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही, तीन वर्षापासून त्यांना गणवेश मिळालेला नाही, कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याची धन्यता देखील सत्ताधारी दाखवित नाहीत. केवळ सुपाºया वाजविण्याचे कामच त्यांच्याकडून होत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे या विरोधात आता थेट शासनाकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन सेवेचा खाजगीकरणाचा डाव आखण्याचा प्रशासनाचा डाव - आ. केळकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 4:57 PM
टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे आगाराची पाहणी केली.
ठळक मुद्दे१० एसी बसेस बंद४० बसेस टायर अभावी धुळखात