ठाणे : धर्मादाय रु ग्णालयांनी मोफत व सवलतीच्या दरात गरीब रु ग्णांसाठी खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. रु ग्णालयांनी खाटा उपलब्ध करून न दिल्यास ठाणे जिल्ह्यातील रुग्णांनी १०४ या हेल्पलाइनवर तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे ०२२-२५३४६५२३ या क्रमांकावर त्वरित तक्रार करण्याचे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.मोफत व सवलतीच्या दरात खाटा राखून ठेवण्याबाबतच्या अंमलबजावणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या समितीचे प्रमुख ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर या वेळी उपस्थित होते. सद्य:स्थितीला जिल्ह्यात १६ धर्मादाय रु ग्णालये असून त्यात दोन हजार ४९४ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रत्येकी निर्धन तसेच दुर्बल रु ग्णांसाठी मिळून ५०२ खाटा उपलब्ध असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी या वेळी सांगितले. मात्र. त्याचादेखील गरिबांना फायदा होत नसल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेऊन या धर्मादाय रुग्णालयांना गरिबांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात डॉ. डी.वाय. पाटील, तेरणा मेडिकल कॉलेज, एमजीएम वाशी आणि बेलापूर, पीकेसी हॉस्पिटल वाशी, लायन आर. झुनझुनवाला हॉस्पिटल कोपरखैरणे, भक्तिवेदान्त हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन, रहेमानिया हॉस्पिटल, स्वामी सर्वानंद हॉस्पिटल, मानव कल्याण, महाराष्ट्र होली क्र ॉस, सोशल सर्व्हिस लीग अॅण्ड जनरल हॉस्पिटल, अर्चना पब्लिक ट्रस्ट, सेंच्युरी रेयॉन आदी रुग्णालयांना गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. रु ग्णांना कोणत्या रु ग्णालयांत किती खाटा आहेत, याची माहिती नसते. ही माहिती त्यांना मिळावी, म्हणून रुग्णालयांच्या सूचना फलकांवरही याची माहिती देण्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेची ओळखपत्रे रु ग्णांकडे नसतात. यासाठी विशेष शिबिरे जिल्ह्यात आयोजित करण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले. समितीच्या पथकाने अचानक या रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करण्याचेही त्यांनी या वेळी सूचित केले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, तहसीलदार समीर घारे, सहायक धर्मादाय आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धर्मादाय रुग्णालयांच्या मनमानीला अखेर प्रशासनाचा चाप
By admin | Published: April 18, 2017 3:22 AM