कल्याण : कोपर रेल्वे उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी १० कोटी ३७ लाख ९२ हजार रुपये खर्चास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेने प्रशासकीय मान्यता दिली आहे. रेलकॉन कंपनीने दिलेल्या सल्ल्यानुसार १५ सप्टेंबर २०१९ पासून पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.
कोपर पूल हा धोकादायक झाल्याने तो बंद करण्याचा अभिप्राय आयआयटी या संस्थेने दिला होता. मध्य रेल्वेने याबाबत महापालिकेस मे २०१९ मध्ये कळवले होते. त्यानंतर, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाकडे बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार, रेलकॉनची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
पुलाच्या बांधणीवेळी फाटक असल्याचा पुरावा महापालिकेने रेल्वेला सादर केला आहे. पुलाचा खर्च रेल्वे व पालिकेने प्रत्येकी ५० टक्के विभागून घेणे अपेक्षित आहे. फाटकाचा पुरावा नसल्याने ५० टक्के खर्च देण्यास रेल्वेने हात वर केले होते. पूल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता १० कोटी खर्चास मान्यता देण्याचा विषय जानेवारीत झालेल्या महासभेत घेतला. त्यामुळे मान्यता देऊन त्याची निविदाही महापालिकेने मागविली. पहिल्या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारची कामे करणारे कंत्राटदार रेल्वेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे रेल्वेने कंत्राटदार सुचवावा, असेही दुसऱ्या निविदेच्या वेळी महापालिकेने रेल्वेला पत्राद्वारे कळवले. ५० टक्के खर्चासंदर्भात रेल्वेकडे पत्रव्यवहार करून त्याविषयीचा करारनामा केला आहे. १४ डिसेंबर २०१९ रोजी खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाची कोपर पुलासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी करारनाम्याचा उल्लेख केला आहे. रेल्वेने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे १० कोटी ३७ लाख ९२ हजार रुपये पुलाच्या पुनर्बांधणीचा खर्च यंदाच्या लेखाशीर्षकात समाविष्ट करण्यात यावा, यासाठी प्रशासकीय मान्यता महासभेने दिली आहे. ठाकुर्ली, मोहने, वालधुनी आणि इतर ठिकाणचे उड्डाणपूल आणि बोगदा तयार करण्यासाठी महापालिकेने लेखाशीर्षकात २० कोटींची तरतूद केली आहे.पुलावर असा होणार खर्च!पुलाचा स्लॅब, पोहोच रस्ता आणि राजाजी पथ येथील अंडरपास हा नव्याने करावा लागणार आहे. त्यासाठी रेलकॉनने प्राकलन तयार केले. यापैकी पुलाच्या स्लॅबसाठी दोन कोटी ६१ लाख रुपये, अंडरपास व पोहोच वळण रस्ता यासाठी सात कोटी ३८ लाख रुपये आणि पुलावरील पथदिवे व्यवस्थेसाठी ३८ लाख ४९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.