नितिन पंडीत -
भिवंडी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालय , उच्च महाविद्यालय व पदवी तसेच पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश देतांना संबंधित महाविद्यालयांनी केवळ १२० रुपये फी आकारून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल वाणी यांनी बुधवारी थेट मुबई विद्यापीठात कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्या दालनात आंदोलन केले . यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२० रुपयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्य शासन व मुबई विद्यापीठ यांनी २५ ऑगस्ट २००४ साली काढलेल्या अध्यदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी वाणी यांनी या आंदोलनादरम्यान केली. यावेळी शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , हक्क मागतो भीक नाही , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी मध्य सवलत मिळालीच पाहिजे अशा घोषणांनाही कुलगुरूंचे दालन दणाणून सोडले होते .
कोरोना संकटामुळे अनेकांचे व्यापार उद्योग डबघाईला गेले असून अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांवर आथिर्क संकट आले असल्याने महाविद्यालयांची महागडी फी भरण्यास सध्या पालक सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कुलगुरूंचे महाविद्यालयांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने मुंबई विद्यापीठ संलग्न असलेली महाविद्यालये मानमर्जीप्रमाणे फी आकारात असून विद्यार्थ्यांकडून अवाच्या सवा फी सक्तीने वसूल करून घेत आहेत असा आरोप वाणी यांनी यावेळी केला आहे. महत्वाचे म्हणजे २००४ साठी मुबई विद्यापीठ व राज्य शासनाने परिपत्रक काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२० रुपयांमध्ये प्रवेश देण्यात यावे व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाविद्यालयांना देण्यात येईल असा परिपत्रक काढला होता . काही वर या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले मात्र आता विद्यार्थ्यांना फी चे संपूर्ण पैसे महाविद्यालयांना भरावे लागत असून आर्थिक संकटात पालक फी भरू शकत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याने बहुजन विद्यार्थी संघटनेचे अनिल वाणी यांनी आज थेट मुंबई विद्यापीठात कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्या दालनात आंदोलन केले.
दरम्यान कुलगुरूंनी आपल्या आंदोलनाची दाखल घेतली असून लवकरच याविषयावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंच्या प्रतिनिधी डॉ योगिनी घारे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले असून आपल्या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया बहुजन विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल वाणी यांनी लोकमतला दिली आहे.