सुरेश लोखंडेठाणे : अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना मातृत्व, पितृत्व प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘बालक दत्तक’ योजना सुरू केली आहे. कायदेशीर पद्धतीने बालक दत्तक देण्याची प्रशासकीय व्यवस्था आता जिल्ह्यातही आहे. कोरोनाच्या वर्षभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात ४७ मुला-मुलींना दत्तक घेण्यात आले आहे. तर, मागील पाच वर्षांत २२५ बालकांना जिल्ह्यातील दाम्पत्यांनी दत्तक घेतले आहे.
कोरोनाच्या चक्रव्यूहातून मुक्त होण्यासाठी तसेच कोणत्याही आजारास बळी पडू नये, यासाठी सर्वांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात होती. या काळातही मातृत्व, पितृत्वाची आस जिल्ह्यातील बहुतांशी दाम्पत्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ४७ बालकांना कोरोनाच्या कालावधीत दत्तक घेतल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात १० मुले आणि १७ मुलींना दाम्पत्यांनी दत्तक घेऊन आपले दाईत्व सिद्ध केले आहे.
दत्तक घेण्यासाठी १६४ दाम्पत्ये वेटिंग लिस्टवर
मुले, मुली दत्तक घेण्यासाठी अजूनही १६४ दाम्पत्ये वेटिंगवर आहेत. त्यांना अपेक्षित असलेले मुले, मुली दत्तक देण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या नावाचा दत्तक यादीत समावेश करण्यात आला आहे. आपले नाव यादीत समाविष्ट झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला आहे. बालक त्यांच्या घरात आल्यानंतर त्यांचा हा आनंद, उत्साह वाढणार आहे.
दत्तक घेतलेल्या दाम्पत्यांशी विविध कारणांमुळे संपर्क होत असतो. त्या भेटीदरम्यान ते विविध विषयांवर चर्चा करतात. यामध्ये विवाहानंतर पाच ते दहा वर्षांत मूल झाले नाही, मात्र आम्हाला शासनाने मूल दत्तक देऊन आमचा संसार सुखाचा केला आहे. आम्ही खूप आनंदी असून छान वाटत आहे, अशा प्रतिक्रिया दाम्पत्ये देतात. - रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी, ठाणे