मीरारोड : मीरा भार्इंदरमध्ये मेट्रो मार्गा खालुन आणखी एक उन्नत रस्ता बांधण्याच्या २१७ कोटींच्या कामास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या कामाचे कार्यादेश दिल्याची माहिती शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीतुन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. २०२२ सालात या भागात मेट्रोही धावेल, असे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.
काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या शहराच्या मुख्य मार्गावर मेट्रोचे काम सुरु झाले आहे. शहराचा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी नागरिकांना भेडसावू लागली आहे. भविष्यात मेट्रो सुरु झाली तरी वाहतुकीची कोंडी वाढणार असल्याने मेट्रो मार्गाच्या खालीच नागपूर मेट्रोच्या धर्तीवर एक उन्नत रस्ता बांधण्याची मागणी आ. सरनाईक यांनी केली होती. त्या प्रस्तावाची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दोनवेळा प्रत्यक्ष पाहणी केली होती. सोमवारी सदर मेट्रो मार्गाच्या कामाची अणि उन्नत रस्त्याबाबतची पाहणी झाली. यावेळी आ. सरनाईक, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता विकास नाईक व कार्यकारी अभियंता योजना पाटील, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, ठेकेदार जे. कुमारचे नलिन गुप्ता, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक राजू भोईर, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक स्नेहल सावंत, उपजिल्हाप्रमुख विक्र म प्रतापसिंह, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, शहर संघटक श्रेया साळवी आदी उपस्थित होते.मेट्रोच्या कामाने गती घेतली असुन २०२२ पर्यंत मेट्रो धावणार आहे. मेट्रो मार्गाच्या खालुनच २१७ कोटी रुपयांचा उन्नत रस्ता बांधला जाणार असुन त्याला एमएमआडीएने मंजुरी देऊन कार्यादेश दिला आहे.
मेट्रोच्या दुसºया लेव्हलवर मेट्रो मार्ग तर पहिल्या लेव्हलवर काशिमीरा नाका ते सावरकर चौकपर्यंत उन्नत रस्ता असणार आहे. या उन्नत रस्त्याला तीन ठिकाणी खालच्या मुख्य रस्त्यावर उतरण्यासाठी मार्गिकाअसतील. मेट्रोसह उन्नत मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मेट्रोसाठी जो पुल उभारला जाईल तो डबल डेकर पद्धतीचा असेल. खाली मुख्य रस्ता, त्यावर उन्नत रस्ता व सर्वात वरती मेट्रो मार्ग असेल. काशिमीरा नाका येथे असलेल्या उड्डाणपुलाचा शहरवासियांना कोणताच उपयोग होत नाही. त्यामुळे पुलाखालचे रस्ते अरुंद झाले आहेत. म्हणुनच काशिमीरा येथे असलेल्या सध्याच्या उड्डाणपुलाला मेट्रो मार्गाखालुन जाणारा उन्नत रस्ता जोडला जाणार आहे. परिणामी मुंबई वरुन येणाºया वा ठाणे - वसई-गुजरातकडे जाणाºया नागरिकांना काशिमीरा उड्डाणपुलाचा उपयोग होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे उन्नत रस्त्याचा निधी मंजूर झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले.भार्इंदर फाटकावरील उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मंजुरी नाहीभार्इंदरच्या गोल्डन नेस्ट येथील सावरकर चौकापासुन रेल्वे फाटक मार्ग ओलांडून भार्इंदर पश्चिमेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या जंक्शनपर्यंत रस्ता व उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मात्र मेट्रो सोबतच्या वाढीव कामातून वगळण्यात आला आहे. जुन्या फाटका वरुन पूर्व-पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल असावा, अशी मागणी सरनाईकांनी केली होती. परंतु मेट्रो ९ च्या कामात हे वाढीव काम समाविष्ट करणे मूळ योजनेसह तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव आणि निधी मंजूर करावा लागणार आहे. याबाबत सरनाईक म्हणाले की, सदर कामाचा स्वतंत्र प्रस्ताव तयार असुन मेट्रोच्या रेल्वेवरील पुलाच्या कामासह भार्इंदर फाटकावरील पुलाच्या कामाची सुद्धा मंजुरी घेण्याची मागणी एमएमआरडीएला केली आहे.