प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गिर्यारोहण हा असा वेगळा खेळ आहे जिथे स्पर्धा नाही, इथे फक्त निसर्गाशी कृतज्ञ असतो. या विस्तारलेल्या क्षेत्राचे साहसी पर्यटनात रुपांतर झाले ही चांगली गोष्ट आहे. हल्ली पावसाळ्यात भटकंती करताना विशेषत: धबधब्यांवर जातना खूप चुकीच्या गोष्टी घडत असतात. परंतू आपल्या महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ॲडव्हेंचर क्लब महाविद्यालयांत सुरू व्हावे अशी माहिती गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी दिली.
जिज्ञासा ट्रस्ट आणि सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एव्हरेस्ट सहित २८ हजार फुटांवरील आठ उत्तुंग शिखर व्हीआर यशस्वी मोहीम संपन्न करणारण्याचा विश्व विक्रम करणाऱ्या पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे बहाददूर गिर्यारोहकांनी विद्यार्थ्यांशी शनिवारी सतिशप्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथील सभागृहात संवाद साधला. झिरपे म्हणाले की, गिर्यारोहणामुळे माणसाचे आयुष्य बदलते. कष्ट करुन त्या डोंगरावर पोहोचल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करु शकत नाही पण मी हे करु शकलो हा आत्मविश्वास तुमच्यात येतो. प्रत्येकाने साहस करावा त्यामुळे शरीर तर बळकट होते पण मानसीक स्वास्थ्य देखील सुदृढ होते. गिर्यारोहण हा विषय अभ्यासक्रमात यावा हा ऊर्जादायी क्रीडाप्रकार आहे. साहस करा त्यातून तुम्हाला आयुष्यात जे साध्य करायचे ते करता येईल असे देखील ते म्हणाले.
जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे म्हणाले की, शिऱखरावर चढाई करताना त्याचा अभ्यास, योग्य नियोजन करावे लागते. गिर्यारोहणातून पाय जमिनीवर व नजर शिखरावर असावी हे शिकायला मिळते. य्र्यारोहण हा क्रिडी प्रकार नव्हे तर कला, वाणिज्य आणि विज्ञान देखील आहे. गिर्यारोहणात दोन टीम असतात एक म्हणजे गिर्यारोहक आणि दुसरा म्हणजे निसर्ग. इथे अम्पायर आणि प्रेक्षक देखील निसर्गच असतो. ८० टक्के अपघात हे निष्काळजीपणामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, मीरा कोर्डे, प्रा. मंजिरी गोंधळेकर, गिर्यारोहक निकुंज शहा, विवेक शिवडे, प्रसाद जोशी, आशिष माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुणा केंद्रे यांनी केले.