अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या स्वामीनगर झोपडपट्टीत जाहिरातींचा व्यवसाय तेजीत आला आहे. स्थानकाला लागूनच झोपडपट्टी असल्याने अनेक झोपडपट्टीधारकांनी जाहिराती करणाऱ्या दलालांसोबत आर्थिक हितसंबंध तयार करून आपल्या झोपडीसमोर जाहिरातीचे फलक लावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या जाहिरात फलकांवर जाहिरातीही प्रसिद्ध होत आहेत. जाहिरातींचा महसूल ना रेल्वेला, ना पालिकेला. त्यामुळे या बेकायदा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
अंबरनाथ फलाट क्रमांक-१ आणि २ च्या समोरच स्वामीनगरची मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी आणि स्थानकामध्ये काहीच नसल्याने स्थानकातून थेट या झोपड्या दिसतात. स्थानक परिसरातील जाहिरात फलकांवर रेल्वे लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे आता या भागातील झोपडपट्टीधारकांना हाताशी धरून काही दलालांनी जाहिरातीचा बेकायदा व्यवसाय सुरू केला आहे. रेल्वेस्थानकाला समांतर असलेल्या झोपड्यांसमोरच मोठे जाहिरातीचे फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक झोपड्यांवर आहेत, तर काही झोपड्यांसमोर लावण्यात आले आहेत. हे फलक रेल्वेस्थानकात उभे राहणाºया सर्व प्रवाशांना दिसत असल्याने या बेकायदा फलकांवर जाहिरात करण्यासाठीही अनेक व्यावसायिक पुढे आले आहेत.
स्थानकासमोर चार ते पाच बेकायदा फलक उभारण्यात आले असून या सर्व फलकांवर बिल्डर, चाळींचे बांधकाम करणारे बिल्डर आणि डॉक्टरांच्या जाहिराती झळकत आहेत. या बेकायदा जाहिरात फलकांवर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या जाहिरातींचे फलक स्थानकाच्या परिसरात लावण्यात आले आहेत, ती जागा पालिकेच्या हद्दीत आहे. तर, त्याला लागूनच आता अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारला जात असल्याने या जाहिरातींना आणखी तेजी येणार आहे. त्यामुळे या जाहिरातींचे फलक उभारणाऱ्यांकडून दंडात्मक वसुली करण्याची मागणी केली जात आहे.
दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे स्थानकात येणाºया नैसर्गिक हवेचा मार्गच बंद केला आहे. हवेच्या मार्गामध्ये जाहिरात फलक येत असल्याने स्थानक आणि स्थानक परिसरातील काही फलक काढण्याची गरज व्यक्त होत आहे. चारही बाजूने जाहिरात फलकांचा विस्तार होत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोकास्थानकात ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात, तेथे त्यांच्या डोक्यावरही लहान फलक तारेने बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा फलक प्रवाशांच्या डोक्यावर पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने असे धोकादायक फलक काढावे अशी मागणी केली जात आहे.