ठाणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या भागीदारांसह कुटुंबीयांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये त्यांनी आपला चिंरजीव अभिषेकला बांधकाम व्यवसायात कधीच न येण्याचा सल्ला दिला आहे. यावरून त्यांना आपल्या व्यवसायातील कारकिर्दीत किती कटू अनुभव आले असतील, याची प्रचिती येते आहे. त्यांनी बुधवार, ७ आॅक्टोबर रोजी सॅम्पल फ्लॅटमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली, तसेच त्यांनी तत्पूर्वी लिहिलेल्या २० ते २५ पानी डायरीच्या सुसाइड नोटमध्ये त्यांना सरकारी यंत्रणा आणि महापालिका अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांमुळे कसा त्रास झाला, त्याचबरोबर भागीदारांबद्दल त्यांनी भागीदारांना, ‘तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे, तसेच माझ्या मृत्यूनंतर तरी यंत्रणेत पारदर्शकता येईल,’ असे म्हटले आहे.त्यांनी कुटुंबीयांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी त्यांच्या भावांसह मोठा मुलगा अभिषेकला, ‘माझे तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.’ तसेच बीएमएस झालेल्या अभिषेकने वडिलांच्या बांधकाम व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवातही केली होती. मात्र, त्यांनी त्याला ‘या क्षेत्रात कधी येऊ नये,’ असे सुसाइड नोटमध्ये म्हटल्याची माहिती त्यांचे भाऊ उदय परमार यांनी दिली. त्याचबरोबर अभिषेकने आई व भावाची काळजी घ्यावी, तर आम्हा दोघा भावांनी कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असेही नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.>> खोडलेला मजकूर पुन्हा मिळविता येईल डिप्पी वांकाणी, मुंबईकाही राजकरणी आणि ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या उद्धट आणि शिवराळ वागणुकीमुळे टोकाचे पाऊल उचलणे भाग पडले, असे बिल्डर सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) नमूद केले होते. परंतु आपल्या कुटुंबियांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा विचार मनात आल्यानंतर परमार यांनी या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांची नावे खोडल्याचे आढळून आले आहे. तथापि, खोडलेला मजकूर अद्ययावत उपकरणाद्वारे फॉरेन्सिक लॅबला पुन्हा मिळविता येऊ शकतो, असे एका वरिष्ठ न्यायसहायक तज्ज्ञाने ‘लोकमत’ला सांगितले.ही प्रक्रिया स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, वाहनांच्या क्रमांकातील ३ हा अंक ८ मध्ये बदलण्यात आलेला असतो. परंतु, या तंत्राने मूळ अंक ३ होता, याची उकल करता येऊ शकते. त्याच पद्धतीने खोडलेला मजकूर हुडकून काढता येतो. ही सुसाईड नोट कलिना फॉरेन्सिक लॅबकडे पाठवायला हवी होती. पोलिस कार्यवाहीतील दिरंगाईमुळे ही नोट आमच्यापर्यंत येण्यास वेळ लागेल. संबंधित विभागाकडून या संदर्भात माहिती घेतली जाईल, असे सहसंचालक डॉ. बी. बी. दौंडकर यांनी सांगितले. व्हिडियो स्पेक्ट्रल कम्पॅरटर हे उपकरण पृथ:क्करण आणि शाईची तुलना करते. त्यातून खाडाखोडीचा छडा लावता येतो.
मुलाला व्यवसायात न येण्याचा सल्ला
By admin | Published: October 15, 2015 2:39 AM