महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, असे काम करा; काॅंग्रेस निरीक्षकांचा कार्यकर्त्यांना सल्ला
By जितेंद्र कालेकर | Published: October 27, 2024 07:14 PM2024-10-27T19:14:14+5:302024-10-27T19:14:43+5:30
बीएलए यांनी आक्षेप कसा नाेंदवायचा याचाही प्रशिक्षणातून दिला कानमंत्र
ठाणे: महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री हाेईल, अशा पद्ध्तीने काॅंग्रेस कार्यकर्त्याने काम करावे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली कामे मतदारापर्यंत पाेहचवावीत असा सल्ला देतांनाच बीएलएनी बुथवर किती वाजता गेले पाहिजे, त्यांनी आक्षेप कशा प्रकारे नाेंदविले पाहिजेत, याचा कानमंत्रही ठाणे लाेकसभेचे काॅग्रेसचे निरीक्षक तथा केरळचे आमदार संजीव जाेसेफ यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना रविवारी दिला.
ठाणे काँग्रेस द्वारा आयोजित काॅंग्रेस कार्यकर्त्यांसाठी बी एल ए प्रशिक्षण शिबिर आणि निर्धार मेळाव्याचे एनकेटी सभागृह याठिकाणी रविवारी आयाेजन केले हाेते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ठाणे आ. जोसेफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जोसेफ यांनी हा सल्ला दिला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा आणि आपणच उमेदवार आहोत, असे समजून काम करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
या शिबिराला ठाणे शहर आणि जिल्हयातून सुमारे ७०० बीएलए आणि बूथ प्रमुखांना अखिल भारतील काँग्रेस कमिटीच्या टीमने यावेळी मार्गदर्शन केले. अंतर्गत नाराजी दूर ठेवा, गटबाजीलाही थारा देऊ नका. तरच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी यश येईल, असेही ते म्हणाले. यावेळी ठाणे काँग्रेस प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, सहप्रभारी चंद्रकांत पाटील, प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, सेवादल अध्यक्ष रवी कोळी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, सर्व फ्रंट, सेल अध्यक्ष तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.