Advocate Asim Sarode Reaction On Badlapur Case: बदलापूर प्रकरणावरून अद्यापही राज्यभरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वकील असीम सरोदे यांनी पीडित मुलीच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना असीम सरोदे यांनी या प्रकरणी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
बदलापूर प्रकरणातील पोलीस तपासात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चुकीच्या एफआयआरचा आरोपीला फायदा होत आहे. पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी भावना आहे. त्यामध्ये काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी इकडे आलो होतो. न्यायालयात आल्यावर पोलिसांचा तपास पाहून धक्काच बसला. पोलिसांनी याप्रकरणात चुकीची कलमे लावली आहेत. पोलिसांनी पुरेशी माहिती न घेतल्यामुळे हे घडले, असा दावा असीम सरोदे यांनी केला.
पोलिसांवर राजकीय दबाव आहे
पोलिसांवर राजकीय दबाव आहे. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. वकिलांनी आग्रह केल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्रात कलम ६ चा अंतर्भाव केला. आता वकिलांनी पॉक्सोचे कलम ९ लावण्याची मागणी केली आहे, ते लावले जाईल. पोलीस FIRमध्ये नवीन कलमे लावली जात आहेत. ते पाहता लक्षात येत आहे की, पोलिसांनी नीट तपास केलेला नाही. असंवेदनशील पद्धतीने, पुरेशा माहितीअभावी तपास करुन FIR दाखल केला. पीडित मुलींना न्याय मिळाला नाही तर त्यासाठी पोलिसांनी दाखल केलेला चुकीचा FIR कारणीभूत आहे, असा आरोप असीम सरोदे यांनी केला.
दरम्यान, हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर अनेकांना शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे. शाळा सुरु राहणे गरजेचे आहे, असे अनेकजण बोलत आहेत. पण मुलींवरील अत्याचारापेक्षा शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का? ज्या सफाई कर्मचाऱ्याने मुलींवर अत्याचार केला, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याने काय केलं, हे त्याला स्वत:ला माहिती नसल्याचेही म्हटले जात आहे. पोलिसांनी अशा पद्धतीने माहिती देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत. मी त्यादृष्टीने न्यायालयात युक्तिवाद करेन, असे असीम सरोदे यांनी सांगितले.