अंबरनाथ - अंबरनाथमध्ये सहाव्या इयत्तेत शिकणा-या एका विद्यार्थीनीने मागच्या महिन्यात शाळेच्या दुस-या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शाळेची चौकशी सुरु केली आहे. शिक्षकांनी आपल्या मैत्रीला प्रेमसंबंधांशी जोडून टोमणे मारल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले. या 12 वर्षाच्या मुलीने आधी आपण पाय घसरुन पडल्याचे सांगितले होते. पण रुग्णालयात डॉक्टरांनी समुपदेश केल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे खरे कारण सांगितले.
शिक्षकांच्या टोमण्यांमुळे आपण हैराण झालो होतो असे तिने सांगितले. मुलीच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून त्यांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी त्रास देणा-या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण या शिक्षकांवर कोणतीही कारवाई न झाल्याने मुलीच्या कुटुंबियांनी अंबरनाथ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. शाळेने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. मुलगी पाय घसरुन पडल्यामुळे जखमी झाल्याचा शाळेचा दावा आहे.
या मुलीची दुस-या वर्गातील एका मुलाबरोबर मैत्री होती. त्यावरुन 16 जानेवारीला दोन शिक्षकांनी या मुलीला भरवर्गात सर्वांसमोर टोमणे मारले. दुस-या एका शिक्षकाने या मुलीवर प्रेमसंबंधांचा आरोप केला. शिक्षक माझ्यावर फक्त प्रेमसंबंधांचेच खोटे आरोप करुन थांबले नाहीत, तर त्यांनी शाळेमध्ये होणा-या कार्यक्रमाच्या तालीमीत मला घेऊ नये असे माझ्या नृत्य शिक्षकांना सांगितले.
ज्यामुळे मी खूप निराश झाले आणि आत्महत्येचा निर्णय घेतला असे या मुलीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या नैराश्यापोटीच 17 जानेवारीला मी आत्महत्येचा प्रयत्न केला असे या मुलीने सांगितले. या मुलीच्या वडिलांना एफआयआर नोंदवायचा होता. पण पोलिसांनी फक्त अर्ज स्वीकारला. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.