कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रदीर्घ कालावधीनंतर क्रीडाक्षेत्र हळूहळू का होईना, पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कठोर नियम लादण्यात आल्याने क्रीडाक्षेत्र संकटात सापडले आहे. जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रावर संक्रांत आली असताना यात क्रीडा प्रशिक्षकांची परवड हाेत आहे. सध्याच्या संचारबंदीमुळे प्रशिक्षकांसह त्यांचे कुटुंबही अडचणीत आल्याने राज्य सरकारने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी क्रीडा प्रशिक्षकांनी केली आहे.
गतवर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडाक्षेत्रालाही त्याचा मोठा फटका बसला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२१ पासून क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर आले होते. मार्चपासून कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर मांडल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. याचा फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. काही क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण वर्ग नुकतेच सुरू झाले होते. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावात काही दिवसांतच हे वर्ग बंद करण्याची नामुष्की संबंधित प्रशिक्षकांवर ओढवली आहे.
क्रीडा प्रशिक्षकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, जिल्ह्यातील खो-खो, धनुर्विद्या, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलिबॉल व अन्य मैदानी खेळ तसेच स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, ज्यूडो, कुस्ती व योगा यांच्यासह इतर खेळांना मोठा फटका बसला आहे.
---------------------------------------------
लॉकडाऊनमध्ये निर्बंध लागल्यामुळे क्रीडाक्षेत्राचे अतोनात नुकसान झाले असून क्रीडाक्षेत्रातील कोणतीच ॲक्टिव्हिटी सध्या सार्वजनिकरीत्या घेऊ शकत नाही; त्यामुळे प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून क्रीडा क्षेत्राला आधार द्यावा.
- पंकज पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू
---------------------------------------------
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावात क्रीडा प्रशिक्षकांची परवड सुरू आहे; त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. खेळाचे प्रशिक्षक व संघटनांचे पदाधिकारी मिळून मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन देणार आहोत.
- लक्ष्मण इंगळे, अध्यक्ष, शारीरिक शिक्षक शिक्षण मंडळ, कल्याण तालुका
------------------------------------------------------
शिक्षणासाेबतच खेळही महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येक इनडोअर आणि आउटडोअर खेळासाठी क्रीडा प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. कोरोनामुळे त्यांच्यावर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी शासनाकडून काही मदत करता येते का, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- विश्वनाथ भोईर, आमदार, कल्याण पश्चिम