ठाणे: एकीकडे मुंबईत आरे कॉलनीत रात्री मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतर आता ठाण्यातही मध्यरात्री दोन वाजता मेट्रोच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याठिकाणी धाव घेऊन ही कत्तल थांबवण्यासाठी प्रयत्न केला.मेट्रोच्या कामासाठी झाडांच्या केवळ छाटणीची परवानगी देण्यात आली होती. मात्र छाटणी न करता अचानक रात्री दोनच्या सुमारास या झाडांची कत्तल करण्यात आली, असा आरोप मनसेनं केला. याविषयीची माहिती मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षांची कत्तल थांबवली. वृक्षांची कत्तल करायची होती, तर ती विश्वासात घेऊन करणं अपेक्षित होतं. मेट्रो ही काळाची गरज आहे. मात्र अशा प्रकारे अंधाराचा फायदा घेऊन वृक्षांची कत्तल करणं योग्य असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. जवळजवळ पहाटे तीनपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. अखेर वृक्षतोडीचं काम थांबवण्यात आलं. आता यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित प्राधिकरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या झाडांची कत्तल केली जात असताना तिथे वनविभागाचा किंवा संबंधित विभागाचा अधिकारी उपस्थित असणं गरजेचं होतं. मात्र मध्यरात्री झाडांची कत्तल होत असताना एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं मत मनसेनं व्यक्त केलं आहे. वृक्षतोडीसाठी धोरणं आखा आणि वृक्षांवर कुऱ्हाड चालवताना लोकांना विश्वासात घेण्याची मागणी या घटनेनंतर होऊ लागली आहे.
आरे पाठोपाठ आता ठाण्यात मेट्रोसाठी रात्री वृक्षतोड; मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 9:41 AM