ठाणे - डायघर नजिकच्या पिंपरी गावातील नाझिया उर्फ नाझो जमालउद्दीन सिद्दीकी (३२) आणि तिची मुलगी तानिया (११) या दोघींचा खून करणा-या अमिना काचवाला (३७) सह तिघांना थेट गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. या खुनाचा छडा लावण्यासाठी ४० ते ५० जणांकडे चौकशी करून १५० ते २०० सीसीटीव्हीतील चित्रणाची पडताळणी केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.आपल्याला अनैतिक कृत्ये करण्यास भाग पाडल्यामुळे नाझिया आणि तिची मुलगी तानिया यांचा खून केल्याची कबूली आर्शिया हिने पोलिसांना दिली.नाझिया उर्फ नाझो आणि तानिया या मायलेकी त्यांच्या पिंपरी गाव येथील कर्मनगरी कॉम्पलेक्समधील ‘एकलव्य’ इमारतीमधील रुम क्रमांक सात मध्ये ५ नोव्हेंबर रोजी या दोघीही मृतावस्थेत आढळल्या होत्या. नाझियाचा गळा चिरून तर तिची मुलगी तानियाचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. घरातूनही रोकड आणि दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी नाझियाची आई बद्रुनिसा सय्यद (४८) हिने शीळ डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरुद्ध खून आणि दरोडयाचा गुन्हा दाखल केला होता.पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशाने या प्रकरणाच्या तपासासाठी डायघर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. शाह, जी. डी. घावटे आणि ए. आर. भंडारे (जबरी चोरी विरोधी पथक, परिमंडळ १) तसेच उपायुक्त कार्यालयातील उपनिरीक्षक गणेश केकाण अशी चार पथके तयार करण्यात आली होती. कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असतांनाच नाझियाकडे पूर्वी घरकाम करणारी आर्शिया ही मुलगी ४ नोव्हेंबर रोजी येऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यात आली. तेंव्हा ही मुलगी तिच्या साथीदारासोबत याठिकाणी आल्याचेही फूटेजमधून उघड झाले. त्यावरुन या गुन्ह्यातील संशयित आरोपींबाबतची निश्चिती करण्यात आली. त्यानंतर ही चारही पथके तपासासाठी अहमदाबाद, भोपाळ, कर्नाटक आणि मालेगार येथे पाठविण्यात आली होती. खून केल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे टाकून अमिना, आर्शिया आणि त्यांचा साथीदार अलीअकबर काचवाला (२८) हे ठाण्यातून अहमदाबाद आणि तिथून इंदौर आणि पुढे भोपाळ बसने गेले होते. नंतर भोपाळ येथून रेल्वेमार्गे गुलबर्गा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाने हे संशयित आरोपी ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पडताळले. तसेच त्यांचे फोटो त्या त्या ठिकाणी संबंधितांना दाखवून पायाने अपंग असलेल्या अमिना आणि तिच्या मुलीची ओळख पटविली.तसेच या तिघांच्याही जाण्याच्या मार्गाची माहिती मिळवून अखेरी गुलबर्गा येथे लपलेल्या या तिघांनाही सात दिवसांच्या मेहनतीनंतर १२ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी या दुहेरी खूनाची कबूली दिली असून त्यांना सोमवारी सकाळी या प्रकरणात अटक अटक करण्यात आली. तिघांनाही १७ नोव्हेंंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तपास दोन्ही बाजूंनी होणारआर्शिया हिला अनैतिक कृत्ये करायला लावल्याच्या रागातून हा खून केल्याचे आर्शिया तसेच तिची आई अमिना यांनी दावा केला आहे. असे असले तरी खूनानंतर त्यांनी घरातील रोकड आणि दागिनेही चोरले आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजूंनी तपास करणार असल्याचे उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.
अखेर डायघरच्या दुहेरी खूनाचा छडा, माय लेकींसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 9:19 PM