उल्हासनगर : नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू असताना चार वर्षांपूर्वी ३० डिसेंबर २०१९ साली नाल्यात प्लास्टिकच्या पिशवीत मिळालेल्या टायगरला मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले. अनाथ टायगरला एका परदेशी दांपत्याने स्वीकारले असून शहरवासीयांनी व रगडे दांपत्याने त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील नालीत फेकलेल्या प्लास्टिक पिशवीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने, महिलांचा घोळका बघण्यासाठी एकत्र आला. त्यातील काही धाडसी महिलांनी नालीतील प्लास्टिक पिशवी बाहेर काढली असता, काही तासापूर्वी जन्मलेले बाळ जिवंत पण अत्यवस्थ अवस्थेत दिसले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूल सापडल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देऊन त्याचा जीव वाचविण्यासाठीं मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन गेले. पोलीस संरक्षणात मुलावर उपचार सुरू असताना त्यांच्या मेंदूला संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात मुलाला हलवून शिवाजी रगडे यांनी स्वतःचा पैसा खर्च केला. मात्र तब्येत बिघडल्याने, मुलाला मुंबई येथे पोलीस संरक्षणात हलविण्यात आले.
उल्हासनगरच्या टायगरला वाचविण्यासाठी शहरवासीय पुढे सरसावले. टायगरच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियावर दररोज देण्यात येत असल्याने, टायगर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला. पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयाने मदत मागताच काही तासात लाखो रुपये बँक खात्यात जमा झाले. त्यानंतर रुग्णालयाला बँक खाते बंद करावे लागले. तत्कालीन पालकमंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे टायगरच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून होते. सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन व अनेक शस्त्रक्रिया होऊनही टायगर ठणठणीत झाला. तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगरला त्यांच्या ठाणे घरी बोलावून जल्लोषात स्वागत केले होते. त्यानंतर शासन नियमानुसार त्याला नवीमुंबई येथील बालगृहात ठेवण्यात आले. रगडे दांपत्य दरवर्षी तेथे जाऊन वाढदिवसाच्या केक कापून नवनवीन कपडे, खाऊ देत होते. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनीही टायगरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र संरक्षणाचा मुद्दा पुढे करून भेट नाकारण्यात आली होती. इटालियन दाम्पत्यानी टायगरला स्वीकारले नवीमुंबईतील बालगृहातून त्याची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याला एका इटालियन दाम्पत्याने मुलगा म्हणून स्वीकारले आहे. अखेर उल्हासनगरचा टायगर परदेशी झाला असून दत्तक प्रक्रियावेळी रगडे दांपत्य उपस्थित होते.