ठाणे : सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या सैयद मिसम अब्बास उर्फ हॅरी सैयद हुसेनी (२१, रा. इराणी वस्ती, आंबिवली, कल्याण) आणि मुस्तफा सलू इराणी (२२, आंबिवली, कल्याण) या दोन इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून १० गुन्हे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अत्यंत चिवटपणे सुमारे ३०० सीसीटीव्हींच्या पडताळणीनंतर या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
वर्तकनगर भागात १३ जानेवारी २०२४ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या घडल्या होत्या. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम, संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी, इब्राहिम शेख, हवालदार वैभव जोशी आणि मधुसूदन पाटील या पथकामार्फत सुरू होता. याच तपासात पोलिसांनी घटनास्थळ आणि चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल ३०० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींचा कल्याणच्या आंबिवलीपर्यंत माग घेतला.
सापळा लावून केली अटक
- दोन्ही घटनेतील चोरटे वेगवेगळ्या मोटारसायकलवरून कल्याण आंबिवलीच्या दिशेने पळून गेल्याची बाब समोर आल्यानंतर या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला. सैयद मिसम हुसेनी याने गॅलरीतून छताच्या पत्र्यावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास पाठलाग करून पकडण्यात आले.
- सैयदने सोनसाखळी जबरी चोरीचे सहा आणि एक मोटारसायकल चोरीचा अशा सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून मोटारसायकल आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याकडून वर्तकनगर आणि चितळसरचे प्रत्येकी दोन तर कापूरबावडी, विठ्ठलवाडी आणि खडकपाडा येथील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघड झाले.
- दुसरा चोरटा मुस्तफा सलू इराणी यालाही आंबिवलीतूनच सापळा लावून अटक करण्यात आली. त्याने वर्तकनगर आणि कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या परिसरातील सोनसाखळी जबरी चोरीचे दोन तर मुलूंडमधील मोटारसायकल चोरीचा एक अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ३० ग्रॅम वजनाचे दागिने आणि एक मोटारसायकल असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.