ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाच मजली इमारतीत महसूल आस्थापनेसह विविध कार्यालये आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतही नगण्य उपस्थिती आढळली. त्यामुळे अभ्यागतांचे हाल झाले.
वाहतूककोंडी व लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी कार्यालयात उशिरा पोहोचल्याची कारणे कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळाली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासह महात्मा जोतिबा फुले विकास महामंडळ, गौण खनिज, अल्पबचत विभाग, सामाजिक वनीकरण आदींसह अन्य जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उल्हासनगर नागरी संकुल विभाग, बृहन्मुंबई नागरी संकुल, सहसंचालक नगररचना, पुनर्वसन विभाग आदी असून, प्रत्येक कार्यालयात सकाळी साडेदहा वाजेपर्यंत फक्त तीन ते चार कर्मचाऱ्यांची उपस्थिती आढळली.
शुक्रवारपासून सुटी असल्याने बहुतांश कर्मचारी सुस्तावले. कार्यालयांच्या वेळेचे भान त्यांना राहिले नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. या इमारतीमधील जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणातील महसूल शाखा, आस्थापना विभाग, चिटणीस कार्यालय, सामान्य विभाग, प्रांत ऑफिस, निवडणूक शाखा आदी विभागांमध्ये दहा वाजण्याच्या दरम्यान ७५ ते ८० टक्के कर्मचारी व अधिकारी उपस्थित दिसले. मात्र याच कार्यालयांमध्ये साफसफाईची कामे उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले.