मोखाडा : ८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात सरकारी आकडेवारीनुसार ४० गावपाड्यांना अवघ्या १० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून केवनाळा, वांगणपाडा, सप्रेवाडी गोलवडवाडी, पाथर्डी, डोगरवाडी, ठाकरपाडा यांच्यासह १५ गावपाड्यांचे टॅँकर पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहेत. उन्हाळ्यात शहरी भागातही पाण्याची बोंब असते. मग, आदिवासी तालुक्यांबाबत बोलायलाच नको. तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पाणी उपलब्ध नाही, म्हणून तर नियोजनाअभावी धरणे उशाला कोरड मात्र घशाला, अशी येथे स्थिती आहे.तालुक्यात मारुतीचीवाडी, कारेगाव, खोच, पळसपाडा, मध्य वैतरणा अशी पाच धरणे आहेत. शहरी भागाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोट्यवधींचा निधी खर्चून या ठिकाणी धरणांचे बांधकाम झाले. पाणी ही मूलभूत गरज असताना भूमिपुत्रांनाच त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाल्याने मोखाडावासीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणूक काळात सर्वच पक्ष-अपक्षांकडून नागरिकांची दिशाभूल केली जाते. त्यानंतर, पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती निर्माण होते.तालुक्यातील पाड्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची मोठी चणचण निर्माण झाली. महिलांना कळशीभर पाण्यासाठी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन उन्हातान्हात वणवण करावी लागत आहे. अशी भयानक स्थिती येथील असूनसुद्धा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. प्रशासनाने मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी कोचाळे या ठिकाणी मध्य वैतरणा प्रकल्पाच्या माध्यमातून १२० किमी लांबीच्या अंतरावर पाणी पोहोचवले, मात्र याच धरणाच्या परीसरातील गावपाड्यांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्या तुडवाव्या लागत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. ५० पेक्षा अधिक गावपाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसागणिक टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात काय होईल हा प्रश्न आहे. (वार्ताहर)
पंधरा दिवस झाले तरी टॅँकरचे प्रस्ताव पडूनच
By admin | Published: April 07, 2016 1:07 AM