ठाणे: ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत ठाणे पोलिसांनी पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका १९ वर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने छडा लावला. वर्षअखेरीस या मुलीचा शोध घेऊन नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिच्या पालकांना ठाणे पोलिसांनी एक अनोखी भेट दिली.भिवंडीच्या कोनगाव भागात राहणारे निनाद म्हात्रे (नावात बदल) यांची १४ वर्षीय मनाली (नावात बदल) ही मुलगी ३० आॅगस्ट २०१३ रोजी बेपत्ता झाली होती. दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने २०१४ मध्ये काढले होते. याच आदेशानुसार २९ नोव्हेंबर २०१४ रोजी मनालीच्या अपहरणाचा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. २०१५ मध्ये हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे आले. त्यावेळी बेपत्ता झालेली मनाली आता ठाण्याच्या कोपरी परिसरात असून ती रेल्वे स्थानकाजवळ जुने कपडे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली. तिच्याकडील मोबाईलच्या आधारे पोलीस हवालदार राजन मोरे, विजय बडगुजर आणि राजकुमार तरडे आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तिचा शोध घेतला असता ती विवाहित असल्याची माहिती समोर आली. १९९९ मध्ये तिच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी २००५ मध्ये दुसरा विवाह केला. पण, दुसऱ्या आईकडून होणा-या छळाला कंटाळून तिने घर सोडले. मुलूंड रेल्वे स्थानकातच ती वास्तव्य करीत होती. तिथे एका अपंगाने तिला मदत केली. त्याच्या ओळखीतून एका महिलेने तिचा एका गुजराती मुलाशी विवाहदेखील केला. आता १९ वर्षांची असलेल्या मनालीला एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. अत्यंत चिकाटीने तपास करुन दौंडकर यांच्या पथकाने पाच वर्षे चार महिन्यांनंतर या मुलीचा अखेर शोध घेतला. वडिलांनाही मनाली मिळाल्याची माहिती दिली. कोनगाव पोलिसांच्या मार्फतीने तिची वडिलांशी भेट घडवून आणली जाणार आहे. ती सज्ञान असल्यामुळे तिला वडिलांकडे जायचे की तिच्या पतीकडेच राहायचे याबाबतचा सर्वस्वी निर्णय तिच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले..
पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा लागला शोध
By जितेंद्र कालेकर | Published: December 31, 2018 10:07 PM
पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका १९ वर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने छडा लावला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी ही भेट घडवून आणल्याने मुलगी आणि तिच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठळक मुद्दे‘आॅपरेशन मुस्कान’ठाणे पोलिसांनी दिली नववर्षाची अनोखी भेटकोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल