उल्हासनगर : चार वर्षे उलटली तरी सिंधुभवनच्या इमारतीचे काम अर्धवट राहिले असून सिंधी समाजात नाराजीचे वातावरण आहे. या कालावधी या वास्तूचा खर्च चार कोटींवर पोहचला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हा विषय गाजण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात सिंधुभवन, व्हीटीसी मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला मान्यता देण्यात आली. त्यापैकी तीन मजल्यांची डॉ. आंबेडकर अभ्यासिका बांधण्यात आली आहे. व्हीटीसी मैदानाची मालकी शासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने मैदानाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. तर कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनमध्ये तळमजला अधिक तीन मजल्याच्या सिंधुभवनच्या कामाला मंजुरी देण्यात आली. दीड वर्षात भवनाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडल्याने खर्च चौपट वाढला आहे. सिंधुभवनच्या कामाबाबत राजकीय नेत्यांसह सामाजिक संस्थेनेही चुप्पी साधली आहे.
सिंधुभवनाच्या बांधकाम परवान्यापासून इतर कामांवर वेळोवेळी प्रश्नचिन्हे उभे ठाकले. सिंधी समाजाच्या अस्मितेची वस्तू पूर्ण करण्यासाठी राजकीय नेत्यांसह सिंधी समाजातील जागरूक ाागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रभाग समिती क्रमांक-३ च्या बाजूला सिंधुभवन इमारत उभी राहत आहे. प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यांना भवनाच्या प्रगतीबाबत माहिती नसल्याचा प्रकार उघड झाला. तसेच अभियंता संदीप जाधव यांनी सिंधुभवनची फाइल बघून माहिती देतो, अशी उत्तरे देण्याची वेळ आली. तसेच उपमहापौर जीवन इदनानी यांनीही इमारतीच्या कामाबाबत कानावर हात ठेवले. तर भाजप शहराध्यक्ष कुमार आयलानी, आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांनी सिंधुभवनाचा विषय घेतला. मात्र, भवन पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची टीका सुरू आहे.
व्हीटीसी मैदान विकासासाठी १० कोटींचा निधीव्हीटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिल्हास्तरीय क्रीडासंकुल उभे करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व विरोधी पक्षनेता धनजंय बोडारे यांनी प्रयत्न केले. मैदानाची मालकी महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने मैदानाची मालकी पालिकेकडे हस्तांतर झाली. क्रीडासंकुलासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे समजते.