ठाणे : कोरोनाची लक्षणे असूनही घरीच उपचार घेणाऱ्या चिरागनगर मधील एका ८२ वर्षीय वृध्दाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. मात्र त्याच्या अंत्यविधीनंतर या मृताचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला असल्याने आता झोपडपट्टीचा परिसर असलेल्या चिरागनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या १८ नातेवाईकांना क्वॉरन्टाइन होण्यास विलंब होत असल्याने कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ठाण्यात रु ग्णवाढीचा वेग जास्त असताना प्रशासन मात्र अशा प्रकारच्या वारंवार घटनांकडे म्हणावे तसे गांभीर्याने लक्ष देत नसल्यानेच ठाण्यात कोरोनाची संख्या अजूनही आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष करून झोपडपट्टी सारख्या भागात वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रादुर्भाव वाढलाच नसता. दाटीवाटीचा परिसर असलेल्या चिराग नगर परिसरात एक ८२ वर्षीय व्यक्ती आजारी असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांना ताप आणि इतर लक्षणे असल्याने त्यांची १८ मे रोजी कोविड-१९ ची टेस्ट केली होती. मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला मात्र त्याआधी ही माहिती उघड झाली नसल्याने त्यांचे नातेवाईक आणि काही नागरिक त्यांच्या अंत्यसंस्कारसाठी गेले होते. जे लोक अंत्यसंस्कारासाठी गेले होते त्या १८ ते २० जणांना क्वॉरान्टाइन करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप चिरागनगर मधील काही रहिवाशी करत आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाशी संपर्कसाधला असता सर्व प्रकारची माहिती घेतली जाणार असून त्यानंतर पुढची कार्यवाही करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. चिरागनगर हा झोपडपट्टीचा भाग असल्याने या ठिकाणी घरे लागून आहेत याशिवाय सार्वजनिकशौचालय आल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सदर रुग्णाच्या नातेवार्इंकानी त्यांचा रिपोर्ट लपविण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी चाचणी देखील खाजगी लॅबमध्ये केली होती, त्यांच्याकडून रिपोर्टची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांनी उशिरापर्यंत रिपोर्ट दिला नाही. अत्यंविधीसाठी गेलेल्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांना घरी राहण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.
वागळेच्या घटनेची चौकशी होणार - विजय सिंघलवागळे परिसरात रु ग्णवाहिका वेळेवर न आल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असे माळवी यांनी स्पष्ट केले आहे.