लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीतील गॅस शनिवारी रात्री संपल्याने अर्धवट जळालेल्या मृतदेहावर तब्बल तीन दिवसांनी मंगळवारी पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. धक्कादायक व संतापजनक बाब म्हणजे तीन दिवस हा मृतदेह त्या गॅस दाहिनीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडून होता.
भाईंदर पश्चिमेस भोलानगर भागात महापालिकेची स्मशानभूमी आहे. पश्चिमेकडील ही एकमेव स्मशानभूमी असून येथे गॅसवरील शवदाहिनीत तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात. पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषण टाळण्याकरिता अनेक नागरिक गॅसवरील शव दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देतात. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी प्रामुख्याने गॅस दाहिनीत करण्यात येतात. त्यामुळे गॅस दाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीसह गॅस पुरवठ्याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्यक होते.
गेल्या शनिवारी रात्रीच्या वेळी गॅस दाहिनीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असतानाच गॅस संपला. त्यामुळे दहनविधी पूर्ण झाला नाही. तातडीने गॅस उपलब्ध करून अंत्यसंस्कार केले गेले नाहीत. तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी गॅस उपलब्ध झाल्यावर त्या मृतदेहावर उर्वरित अंत्यसंस्कार करण्यात आले. संतापजनक बाब म्हणजे तीन दिवस तो अर्धवट जळालेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता.
............
ही अतिशय लाजिरवाणी पण संतापजनक घटना आहे. पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी जनतेच्या पैशातून स्वतःची दालने आलिशान करतात, वाहन आदी भत्त्यांसाठी कोट्यवधी रुपये उधळतात. जिवंत असताना सर्वसामान्य नागरिकांना पालिका आवश्यक सुखसुविधा देत नाही. निदान मृत्यूनंतर तरी अशी विटंबना होता कामा नये.
-मीलन म्हात्रे, माजी नगरसेवक
..........
दाहिनीतील गॅस संपल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने लगेच कळवायला हवे होते. गॅस नव्हता तर लाकडांचा वापर करून लागलीच अंत्यसंस्कार करता आले असते. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
-दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता, मीरा-भाईंदर महापालिका
............