मीरारोड - मीरा भाईंदरमधील उद्यान विभागाच्या अखत्यारीतील उद्याने, मैदाने व स्मशानभूमीची पाहणी आयुक्त दिलीप ढोले यांनी करून काटेकोपणे देखभाल व स्वच्छता राखणे, झाडांची निगा राखणे व सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले .
आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून ढोले यांनी शहरातील पालिकेच्या आरक्षण, रस्त्यांची कामे, आरक्षणातील विकासकामे आदींचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. सोमवारी त्यांनी भाईंदर पश्चिम येथील राणी लक्ष्मीबाई उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, सालासर हनुमान उद्यान, मुर्धा बाल उद्यान, मूर्धा स्मशानभूमी, मुर्धां दफनभूमी, मुर्धां राम मंदिर तलाव उद्यान, मुर्धां गावदेवी उद्यानआदींची पाहणी केली. यावेळी आयुक्तांसह उपमुख्य उद्यान अधिक्षक व नागेश विरकर, योगेश म्हात्रे , भरत सोनारे आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी अनावश्यक डेब्रिस , साहित्य आदी काढून टाकून स्वच्छ व सुंदर दिसेल, अशी कामे तातडीने करा असे निर्देश दिले. शहरातील हरितक्षेत्र वाढविण्यासह आहे. त्या झाडांची प्रभावीपणे देखभाल व संरक्षण करा. नागरिकांना चांगले प्रदूषणमुक्त पर्यावरण मिळावे, यासाठी हरित क्षेत्र वाढवा. वनीकरणावर भर द्या, असे त्यांनी सांगितले.
उद्यानात लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी गवत किंवा वाळू असायला हवी असताना तेथे केलेल्या काँक्रिटीकरणा बद्दल सुद्धा आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण, लहान मुलांसाठी लावलेल्या खेळणींच्या ठिकाणी काँक्रीटीकरण केल्याने खेळताना मुलं पडून इजा होण्याची भीती आयुक्तांनी व्यक्त केली .