ठाणे : ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू होती. परंतु, आता टेमघर जलशुद्धीकरण केंद्रावर पाच नवीन पंप बसविले जाणार असल्याने त्यातून ७० दशलक्ष वाढीव पाणी मिळणार आहे. तसेच स्टेमच्या माध्यमातून १८८ कोटींचा खर्च करून नव्याने जलवाहिनीचे काम केल्यास त्यातून २० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली.
बुधवारी संजय भोईर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी केली. यावेळी टेमघर येथील पम्पिंगची इमारत ही २० वर्षे जुनी झाली असून तिच्या दुरुस्तीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच प्लान्टच्या वरील चॅनल्सदेखील बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. ही दुरुस्ती झाल्यास त्याठिकाणी नव्याने बसविण्यात येणा-या पाच पंपांनादेखील त्याचा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी नवीन पाच पंप उपलब्ध झाले आहेत, त्यानुसार एका महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होणार आहे. आजच्या घडीला २१० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत आहे. परंतु, हे पंप बसविल्यानंतर पाण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे वाढीव ७० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहराला २८० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच स्टेमकडून जे पाणी उचलले जात आहे, त्याची जलवाहिनी जुनी असल्याने पाणी खेचण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ती जलवाहिनी बदलण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असून स्टेमच्या माध्यमातून हे काम केल्यास त्यासाठी १८८ कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, ठाण्याची पाण्याची निकड लक्षात घेऊन हे काम होणे गरजेचे आहे. १५ किमीची जलवाहिनी निविदा प्रक्रिया राबवून वेळेत बदलली, तर पुढील सात ते आठ महिन्यांत ठाण्याला वाढीव पाण्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.