पवार, मुंडे यांच्यावरील आराेप सहन करणार नाही; आनंद परांजपेंचा आव्हाडांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 06:12 AM2023-12-03T06:12:59+5:302023-12-03T06:13:44+5:30

सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेचे विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हनमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाकडे गेला हाेतात?

After Jitendra Awhad Allegation on Ajit Pawar, Dhananjay Munde, Anand Paranjpe's warning to Awhad | पवार, मुंडे यांच्यावरील आराेप सहन करणार नाही; आनंद परांजपेंचा आव्हाडांना इशारा

पवार, मुंडे यांच्यावरील आराेप सहन करणार नाही; आनंद परांजपेंचा आव्हाडांना इशारा

ठाणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बेछूट आराेप सहन केले जाणार नाहीत. सूरज परमार आत्महत्याप्रकरणी काेणाच्या दरवाजावर डाेके टेकवायला जात हाेतात, अभियंता अनंत करमुसे यांना पाेलिस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात आणि पाेलिस हवालदार वैभव कदम यांच्या आत्महत्येस काेण जबाबदार आहे, या तीन प्रश्नांची उत्तरे जितेंद्र आव्हाड यांनी द्यावीत, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आव्हाड यांना दिले.

कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिरात समारोपाच्या भाषणात बोलताना २००४ ते २०२३ पर्यंत वेगवेगळ्या वर्षी पक्षातील घटनांची सविस्तर माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार नेहमीच खरे बोलतात यामुळे त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच असल्याचा दावाही  परांजपे यांनी केला.

एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू 
सूरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेचे विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हनमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाकडे गेला हाेतात? तत्कालीन सहपोलिस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात? हे एकदा  जाहीर करा. करमुसे यांना अमानुष मारहाणप्रकरणी ५ ऑगस्ट २०२० राेजी रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करू नका. तरी आपल्या खूशमस्कऱ्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलिसांसमोरच करमुसे यांना बेदम मारहाण करून बालिशपणा दाखवलात. या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात राहतोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही  परांजपे यांनी  दिला.

Web Title: After Jitendra Awhad Allegation on Ajit Pawar, Dhananjay Munde, Anand Paranjpe's warning to Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.